शिवशाहीतही असे घडावे?
   दिनांक :16-Mar-2019
 
 
गुरुवारी रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वेस्थानकाजवळील हिमालय नावाचा पादचारी पूल कोसळून सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. 35-36 जण जखमी आहेत म्हणतात. मन सुन्न करणारी ही घटना आहे. दक्षिण मुंबईतील हा परिसर अत्यंत वर्दळीचा समजला जातो. संध्याकाळी तर लोकांचे प्रचंड लोंढे या भागात लगबगीने धावपळ करीत असतात. अशात ही घटना घडावी, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. या पुलाजवळच असलेल्या गोकुलदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात कामावर जाणार्‍या तीन परिचारिकांचा या अपघातात मृत्यू झाला. हाकेच्या अंतरावर त्यांचे गंतव्यस्थान होते. परंतु, नियतीच्या मनात वेगळेच काही असावे. ही घटना झाल्यावर आता नवनव्या उपकथा समोर येत आहेत. जे वाचले ते परमेश्वराचे आभार मानत आहेत. ज्यांचे जिवलग यात मरण पावले किंवा जखमी झाले, ते नियतीला दोष देत आहेत. एका क्षणात होत्याचे नव्हते करणारा हा नियतीचा खेळ आहे, असे म्हणत प्रत्येक जण स्वत:ला समजावत असतो. दुसरे काहीही आपल्या हाती नसते.
हाच तो पूल, ज्यावरून 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री क्रूरकर्मा अजमल कसाब व अबु इस्माईल गोळीबार करीत खाली उतरले होते व नंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपासून आत जाणार्‍या कामा हॉस्पिटलच्या अरुंद गल्लीत शिरले होते. तेव्हापासून या पुलाला ‘कसाब पूल’ असे बोलचालीतील नाव पडले. कालच्या घटनेनंतर हा पूल पुन्हा चर्चेत आला आहे.
 

 
 
सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. परंतु, मनुष्याच्या जिवाची भरपाई कशी होणार? जे मरण पावले ते चाळीशीच्या आत आहेत. कुणावर घरची पूर्ण जबाबदारी असेल, कुणाला लहान-लहान अपत्ये असतील. अशा कुटुंबीयांच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कुठल्या नुकसानभरपाईने भरून निघणार आहे? या कुटुंबीयांच्या घरची स्थिती आज काय झाली असेल, याचा नुसता विचारही काळजाला चरे पाडतो. जे जखमी झालेत ते कुठल्या स्थितीत आहेत, त्यांना किती प्रमाणात मार आहे, कुणाला तर कायम अपंगत्वही आले असेल. या सर्वांची भरपाई रुपयांत नाही करता येत. कुणी करूही नये. अपघातानंतर मुंबईकरांनी तत्काळ मदत व बचावकार्य सुरू केले. मुंबईकर अशाप्रसंगी अत्यंत हिमतीने वागतात, याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. एरवी अगदी अलिप्त राहणारे मुंबईकर, अशा घटनांच्या वेळी मात्र हातातले काम टाकून तत्परतेने मदतीला धावतात. हा माणुसकीचा ओलावा सर्वांनाच आश्वस्त करणारा आहे.
 
आता नेहमीप्रमाणे एकमेकांवर दोषारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करून आधी पुलांच्या डागडुजीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. कुणी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. आठ महिन्यांपूर्वीच अंधेरी येथे असाच पूल कोसळला होता. 2017 मध्ये एल्फिन्स्टन स्थानकावर पुलावरच्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या अशा सर्व पुलांचे ऑडिट करण्याचा आदेश निघाला. ऑडिट झालेही आणि त्यानुसार कार्यवाहीदेखील झाली. असे असतानाही, हा पूल कोसळावा, हे अनाकलनीय आहे. हळूहळू जी माहिती बाहेर येत आहे, त्यावरून हा पूल 1984 साली बांधून पूर्ण झाला होता. या पुलाचेही ऑडिट झाले होते आणि ऑडिटमध्ये या पुलाला किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे नमूद होते, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरिंवद सावंत यांनी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका दिवसात जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी सुरवातीला महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसोबत, रेल्वेच्या अधिकार्‍यांनाही जबाबदार धरले होते. परंतु, आता एफआयआरमधून रेल्वे अधिकार्‍यांची नावे, ते जबाबदार नसल्यामुळे, काढून टाकण्यात आल्याचे समजते.
 
तांत्रिकदृष्ट्या बघायचे, तर पूल रेल्वे विभागाने बांधला होता व नंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे होती. हे सर्व बघितले असता, या अपघाताला मुंबई महानगरपालिकाच थेट जबाबदार असल्याचे दिसून येईल. मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा आहे, हे पुन्हा सांगण्याचे कारण नाही. गेली 25-30 वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. खरेतर इतकी वर्षे सलग सत्तेत असताना, शिवसेनेने मुंबईचे कल्याण करायला हवे होते. परंतु, तसे झालेले दिसत नाही. इथे लोकांचेच ‘कल्याण’ होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत पालिका आहे. हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असतो. मुंबईत अनधिकृत हप्तेवसुली (ज्याला खंडणी म्हणतात) हजारो कोटींची असते म्हणतात. इतका पैसा असतानाही, मुंबई महानगरपालिकेचा कारभार ‘शिवशाही’ला शोभेल असा का नाही, याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेच्या संस्थापकापासून ते आताच्या पक्षप्रमुखापर्यंत सर्वच जण मुंबईतच वाढले आहेत. त्यामुळे या लोकांना मुंबईकरांच्या समस्या नवीन नाहीत. नेमके कुठे काय केले पाहिजे, हेही कळत असेलच. मग त्यावर ताबडतोबीने उपाययोजना का होत नाहीत? बरे, या लोकांना कुणी बाहेरच्यांनी काही सूचना केल्या तर तेही त्यांना सहन होत नाही. तुम्हाला काय कळते? आम्ही इथले मूळनिवासी आहोत, आम्हालाच सर्व समजते, अशी दर्पोक्ती ऐकायला मिळते. अशी स्थिती आहे तर मग, मुंबईतील बाकी सुधारणा सोडून द्या, मुंबईकरांना किमान सुरक्षित आयुष्य तरी का मिळत नाही? आज मुंबईत कुणीही आनंदाने, खुशीने येत नाही. उदरनिर्वाहासाठी तो येतो. धावपळ करीत, काबाडकष्ट उपसत दोन पैसे वाचवून आपल्या कुटुंबीयांच्या गरजा पुरविण्यात मुंबईकर व्यग्र असतात. त्यातच हे अपघात घडतात. निसर्गाचा प्रकोप असेल तर एकवेळ आपण समजू शकतो. परंतु, प्रशासनातील लोकांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचे हकनाक बळी जात असतील, तर कुठलेही स्पष्टीकरण लंगडेच पडणार. मुंबईतील नगरसेवक, महापालिकेतील अधिकारीच काय, साधा कर्मचारीदेखील ऐश्वर्यसंपन्न असतो, असे म्हणतात. कुठून येतो हा पैसा? विविध विकास कामांसाठी आवंटित केलेल्या निधीतलाच असेल ना हा पैसा! मग कामे दर्जेदार कशी होणार? ज्या अधिकार्‍यांकडे देखभालीची जबाबदारी आहे, त्यांना कुणी जाब विचारणारेच नसले की, असा हलगर्जीपणा होतो आणि त्यात निष्पाप लोकांचे बळी जातात.
 
मुंबईकरांच्या सुदैवाने राज्यात संवेदनशील सरकार आहे. तडफदार रेल्वेमंत्रीही मुंबईचेच आहेत. या दोघांनी, आतापर्यंत कुठल्याच सरकारने केले नसेल इतके या साडेचार वर्षांत मुंबईसाठी केले आहे. मुंबई अफाट असल्याने तिच्या समस्याही अफाट आहेत. तरीही फडणवीस-गोयल या जोडीने जे जे शक्य आहे, ते ते केले. परंतु, महानगरपालिकेचीही काही जबाबदारी आहे की नाही? शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो की, आतातरी महानगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडावे. मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वात अग्रकमाचा व्हावा. पक्ष, हिंदुत्वाचा झेंडा, उत्तर भारतीय, मराठी माणूस इत्यादी प्रश्न बाजूला ठेवून, मुंबईकरांचे जीवन जगात सर्वाधिक सुरक्षित होईल, यासाठी सर्वांनीच अहोरात्र श्रम घेण्याची गरज आहे. तरच या मानवी चुकीतून आपण काही बोध घेतला, असे होईल.