‘जगदंबा’च्या विद्यार्थ्यांनी साकारली रेसिंग कार
   दिनांक :16-Mar-2019
 
जालंधर येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वाहनाचे प्रात्याक्षिक
यवतमाळ:  स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रम, अभ्यास, तंत्रज्ञान यांच्या बळावर अत्यंत माफक किमतीत गो-कार्ट या रेसिंग कारची निर्मिती करून पंजाबमधील जालंधरच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथील आंतरराष्ट्रीय ‘गो-कार्ट चॅम्पियनशिप’मध्ये सहभाग नोंदविला आहे.
 

 
 
‘फार्म्युला वन’ या जागतिक स्तरावरील वेगवान स्पर्धेचे छोटे रूप म्हणजे गो-कार्ट आहे. या गोकार्टचा थरार अनुभव आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे. पण जगदंबा अभियांत्रिकीच्या 20 विद्यार्थ्यांच्या चमूने महाविद्यालयात उपलब्ध प्रयोगशाळा व यंत्रसामुग्रीचा उपयोग करीत कमीत कमी खर्चात निर्माण केलेले गो कार्ट हे रेसिंग वाहन प्रत्यक्षात डिझाईन केले आहे.
‘गो कार्ट’च्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी दुचाकीचे 135 सीसी इंजिन वापरले असून, चेसीस आणि त्याचा आकार स्वत:च डिझाईन केले आहे. त्याकरिता कटिया या सॉफ्टवेअरचा उपयोग केला आहे. हे वाहन पेट्रोलवर चालत असून त्याचा अधिकाधिक वेग ताशी 80 ते 90 किमी आहे. हा वेग आणखीही वाढविता येऊ शकतो, पण स्पर्धेच्या नियमावलीनुसार वेगमर्यादा, डिझाइन, इंधन, ग्राऊंड क्लिअरन्स आदी बाबींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या सर्वासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: अत्याधुनिक अन्सिस या सॉफ्टवेअरचा उपयोग केला आहे.
 
या प्रकल्पास विद्यार्थ्यांनी ‘तक्षक’ हे नाव दिले आहे. तक्षक हा प्राचीन संस्कृत शब्द असून याचा अर्थ ‘वेग’ असा होतो. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानविषयक कौशल्य आत्मसात करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नानाविध बाबींचा अनुभव घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आयआयटी तसेच तत्सम महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन प्रशासनाने या प्रकल्पासाठी भरपूर अर्थसाहाय्य केले असून, सहभागी विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वत: योगदान दिले आहे.