व्हायरल फिव्हर
   दिनांक :17-Mar-2019
 
 
 
माणूस ही एकनिष्ठ असणारी जमातच नाही. हवा पाहून तिवा मांडण्याचे माणसांना शिकवावे लागत नाही. आमचा एक साक्षात्कारी मित्र होता. तसा तो हरेकच गावात एक असतो. अत्यंत दार्शनिक असतात ही मंडळी. त्यांच्याकडे शब्दसंपदाही अफाटच असते. तसा हाही होता. तो एकदा म्हणाला होता, ‘जिसकी चलती, उसकेच्य सामने अगरबत्ती जलती’ हेही अगदी खरेच आहे. आता बघाना कालपर्यंत थंडीऽऽ गुलाबीऽऽ म्हणत गुलजार होणारे आता घरात कुलर्स लावू लागले आहेत. गुलमोहर फुलल्याबरोबर ही मंडळी गुलाबी रंग विसरली आहेत. हिटरचे कुलरवर आले आहेत. हे असेच होते. सुरेश भटांची एक गज़ल आहे, त्याची पहिली ओळ, ‘हे असे असले तरीही, हे असे असणार नाही...’ असता या शेरमधली दुसरी ओळ काही आपल्या कामाची नाही. कारण ‘दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही’ म्हणत काही आम्ही एकाच ठिकाणी चिकटून बसत नाही. ज्याचे दिवस असतील म्हणजे ज्याच्यासमोर अगरबत्ती जळत असेल त्याच्या दरबारात आम्ही सामील होत असतो. त्यामुळे सध्या राजकारण्यांना भाजपाच्या वाटे हळद-कुंकू दाटे, असे वाटू लागले आहे. इतकी वर्षे ज्या पक्षांत राहून सत्ता उपभोगली अन्‌ चलतीच्या काळात चार अगरबत्त्या स्वत:च्या समोरही जाळून घेतल्या तेच आता कॉंग्रेस सोडून भाजपात दाखल होत आहेत.
 

 
 
निवडणुकीच्या काळात होणारा हा व्हायरल फिव्हरच आहे. तुम्हाला काही झाले अन्‌ डॉक्टरकडे गेलात तर तो तपासून औषधे देतो; पण असे होण्याचे काय कारण असे विचारले तर एकच उत्तर असते, ‘व्हायरल आहे...’ म्हणजे सांगता येत नाही; पण झाले हे असे आहे. निदान करताना डॉक्टरांनी इतके तरे सांगावेना निदान की असे का झाले? असो, विषय तो नाही. विषय व्हायरल असण्याचा आहे. सध्या हे असे इकडचे तिकडे जाणे अत्यंत व्हायरल झाले आहे. ओघ मात्र भाजपाकडे आहे. आता काही नाराज पावले इकडे तिकडेही भटकत आहेतच; पण त्यांची संख्या कमी आहे. तिकिट नक्की होतपर्यंत यांची भाषा एकच असते. ‘मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आजवर मला जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली आहे. आताही पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते मी करीन.’ असे हे सांगत असतात. त्याचवेळी तिकिटासाठी दिल्लीत फिल्डींग लावून ठेवलेली असतेच. यांच्या वडिलांपासून त्यांच्यावर पक्षाने चांगल्याच जबाबदार्‍या टाकलेल्या असतात. म्हणजे वडील आमदार, खासदार अन्‌ मंत्री वैगरे राहिलेले. त्यांना हे सारे नकोच होते. पक्ष आणि जनतेची सेवा इतकेच काय ते त्यांचे अवतारकार्य आहे, असे त्यांना वाटायचे. मात्र आता पक्षाने जबाबदारी टाकलीच तर हे काय करणार? आता वडील गेल्यावर पक्षाने यांच्यावर अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या टाकलेल्यात आजवर. आताही तिकिट मिळेलच अन्‌ श्रेष्ठी मलईदार जबाबदारी टाकतीलच, हा विश्वास आहेच. ‘मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे.
 
त्यामुळे पक्षाला मी संघटेनत काम करावे, असे वाटत असेल तर मी तेही करेन...’ असे स्टेटमेंट दिले जाते. तिकिट कटते आहे आपली यावेळी, हे लक्षांत आले तर काही अडचण नसते. कारण हे लोकनेते असतात. ‘अजातशत्रू’देखील असतात. त्यांचे विरोधी पक्षांतही मित्र असतात अन्‌ कठीण समयी हे मित्रच कामी येत असतात. तिकिट नाही भेटली तर आमची दारं खुली आहेत, असे त्यांनी आधीच सांगून ठेवलेले असते अन्‌ तोवर आपल्या पक्षाचा उमेदवार नक्की केलेला नसतो. या ‘निष्ठावंतांची’ इकडून तिकिट कटली की मग हे तिकडे दाखल होतात अन्‌ मग त्यांच्यावर तो पक्ष अपेक्षित ती जबाबदारी टाकतो. यांच्यात वैचारिक पातळीवर अचानक असा आमुलाग्र असा बदल घडून येत असतो. कालपर्यंत हेही तेच करत असतात पण आज अचानकच, ‘पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीची इतक्या हीन पातळीवर येवून टिका करणे मला पटले नाही...’ असे म्हणत हे पक्षांतर करतात किंवा, ‘अभिव्यक्तीचा गळा घोटला जात होता माझ्या...’, असे म्हणत हे बाहेर पडतात.
 
निवडणुकीत तिकिट हा फारच संवेदनशील विषय असतो. कुठल्या नेमक्या वेळी कुठल्या मतदारसंघातली तिकीट जाहीर करायची, हे श्रेष्ठींना माहिती असते. आपल्या पक्षातल्या बंडखोरांनाही पलिकडे उडी मारून तिकडून फलंदाजीला उतरण्याची संधी आणि वेळ मिळू नये, ज्याला ती द्यायची आहे त्यालाही जास्त उडण्याची संधी नको अन्‌ विरोधी पक्षालाही कळू नये की समोर कोण येणार आहे ते... असे अनेक गेम असतात. प्रत्येकाला वाटते, तिकिट आपलीच आहे. ‘तयारीला लागा’ असे ‘वरून’ सांगण्यात आले आहे, असे इच्छूक सांगत असतो. मात्र हँडबीलं, पोस्टर्स छापून ठेवायचे का? गाड्या एंगेज करायच्या का? असे अनेक प्रश्न कायम असतात. बरं अनेक फंडे असतात. आवयाही उठत असतात. काही कार्यकर्ते राजकारण पंडितच असतात. म्हणजे यांना संजयासारखी दिव्य दृष्टी लाभली असते की काय, असे वाटते. कारण कुठल्याच वृत्तसंस्थेलाही जे कळत नाही ते यांना कसेकाय कळते, हा प्रश्नच आहे. म्हणजे हे सांगतात, यंदा आपल्या मतदारसंघात महिलेलाच उमेदवारी द्यायची असे ठरले आहे... बरे हे इतके ठाम प्रतिपदान असते की त्यावेळी हा तिथेच होता, िंकबहुना याला विचारूनच हा निर्णय घेण्यात आला, असे वाटावे. ‘कसेकाय? कुठे ठरले अन्‌ केव्हा?’ असे प्रश्न विचारले की हे, ‘‘काल रात्री दोन वाजता, दिल्लीत... राजू शेट्टी अन्‌ राहुलजींची भेट झाली तेव्हा...’’ रात्री दोन वाजता हा तर आपल्या घरी नाइंटीच्या अमलात झोपला असताना याला हे कसे काय कळले, हा प्रश्न विचारणे तर दूरच, पडूही द्यायचा नसतो. अशा पद्धतीने आवया उठत राहतात. हा जांगळबुत्ता तुमच्या समाज माध्यमांपेक्षाही तेज आहे.
 
 क्षणात कित्येक मैल ही वार्ता पसरलेली असते आणि सांगणार्‍या दहापैकी किमान आठ जणांकडे ही ‘फर्स्ट हँड इर्न्फमेशन’ असते. ‘‘रात्री दोन वाजता घडले हे, सव्वादोनले त आपल्याकडं वार्ता होती ना... बाजूले हे झोपली होती हिले म्या सांगतही ना का महिला उमेदवार देनार पार्टी म्हून...’’ इतक्या ताकदीनं सांगतात ना हे. त्यामुळे पार्थ साठी पवार साहेब माढ्यातून नाही लढणार, हेही यांना पवारांच्या आधीच माहिती असते. खरेतर त्याला (म्हणजे पार्थला) बारामतीतूनच उमेदवारी हवी होती; पण काकाआबा लढणार नाही, या अटीवर त्याने मावळमधून मान्य केले, इतकी खोलवर वार्ता यांना माहिती असते. नगरमधून सुजय विखे भाजपाच्या तिकिटावर लढणार, हे या अशा संजय टाईपच्या दिव्यदृष्टीवाल्यांना किमान महिनाभर आधीच माहिती असते अन्‌ त्यांनी ते तेव्हाच कुणाजवळ तरी बोलूनही ठेवलेले असते... नातवासाठी आजोबाला तडजोड करावीच लागणार, असं सांगत हे या घटनेचे कौटुंबिक अंगानेही विश्लेषण करतात. ‘‘आता काय आहे की मोठ्या पवार साहेबांना तसा वारस नाही ना... ताई आहेत, पण त्या काही पवार नाहीत ना. म्हणून आता दादांची मुलंच वारस. त्यांना मग पार्थ दिल्लीत अन्‌ तो दुसरा मुंबईत, अशी योजना आहे, असेही हे सांगून टाकतात. कुठल्या मतदारसंघात कुणाची सीट नक्की आहे, हे यांना किमान वर्षभर आधीपासूनच माहिती असतं. आता या दिव्यदृष्टीचा रोगही निवडणुकीच्या वातावरणात व्हायरल झालेला आहे. तेव्हा जरा जपून!