बूमरँग होणारी विधाने!
   दिनांक :17-Mar-2019
 ही तो रश्रींची इच्छा!
- र. श्री. फडनाईक
 
अच्छा! तर कॉंग्रेसचे हे चीन-प्रेम आनुवंशिक आहे! त्याची थोडीफार कल्पना आम्हाला होती, पण तपशील माहीत नव्हता, जो कॉंग्रेसच्याच सर्वोच्च पदाधिकार्‍याने केलेल्या विधानाच्या विश्लेषणानंतर ज्ञात झाला.
हे वाचले होते आम्ही, की 1954 मध्ये भारताचे तेव्हाचे पंतप्रधान कॉंग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनच्या चौ (नर्हेी) यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंचशील करार झाला! 'हिंदी-चिनी भाई भाई’चा उद्घोष निनादला! हेही वाचले होते, की चीनच्या नव्या राजवटीला जगातील मोठ्या राष्ट्रांनी टाळले, पण भारताने मात्र कवटाळले! पुढे चीनने एकतर्फी भाऊबंदकी केली ती गोष्ट निराळी! एक स्वतंत्र देश म्हणून भारत अस्तित्वात आल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदचेे स्थायी सदस्यत्व भारताला देऊ करण्यात आले होते, पण चीनप्रति असलेल्या अतीव प्रेमापोटी भारताने ते नाकारले! याला म्हणतात प्रेम! परवा चीनने मसूद अझरला युनोत संरक्षण दिल्याचे माहीत होताच कॉंग्रेसला आनंदाच्या उकळ्या का फुटाव्यात, असा प्रश्न भाजपाचे रविशंकर प्रसाद यांनी उगाच विचारला! प्रेम हेच त्याचे उत्तर नाही का!
 

 
 
प्रेमात भांडणं होतच असतात! तसे ते १९६२ मध्ये झाले. झगडा एक महिना सुरू होता- २०.१०.१९६२ ते २१.११.१९६२! शेवटी चीनला वाटलं आता पुरे करावं अन्‌ एकतर्फी सुरू केलेलं भांडण, चीनने एकतर्फीच बंद केलं! फार मोठा भूप्रदेश चीनने गिळंकृत केला. प्रेमापोटी! तेव्हाचे पंतप्रधान घाबरले मात्र नाहीत! विद्यमान पंतप्रधानांसारखे! काँग्रेसचा निधड्या छातीचा नेता म्हणाला, मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना घाबरतात! त्यांची बोबडी वळते! काहीच नाही, तर निदान माझ्यासारखे काही बोबडे बोल बोलायला पाहिजे होते! यावर काय बोलायचे! एवढेच, की या देशाच्या पंतप्रधानाच्या क्षमतेबाबत स्वत:च कल्पनाविलास करायचा अन्‌ त्या विलासात रमून आनंद घ्यायचा, ही शंभरातून एखाद्याची धारणा राहू शकते, त्याकडे जनतेने नवलाने पाहू नये; ती नवलाई नाही!
 
१९६२ च्या युद्धात सारा देश तेव्हाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी भक्कमपणे उभा झाला. कोणीही सरकारला कमकुवत म्हणून हिणविल्याची हीनता दाखविली नाही! देशाचे परराष्ट्र धोरण चुकल्याचे स्पष्ट दिसत होते, पण त्याचा उच्चार युद्धकाळात केला नाही. देशाचा पंतप्रधान दुसर्‍या राष्ट्राच्या अध्यक्षाला घाबरतो, याचा अर्थ ‘हा देश त्या देशाला घाबरतो’, असा होतो, हे तेव्हाच्या विरोधकांना समजत होते, आताच्या नेत्याला समजत नसेल, तर ते या देशाचे दुर्दैव! जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवदी जाहीर करण्यात चीनने घातलेल्या खोड्याने कॉंग्रेस आनंदित होण्याचे आणखी एक कारण आहे, हे भाजपाने समजून घेतले पाहिजे. कॉंग्रेसने त्याचा अझरजी असा उल्लेख करून तो सन्माननीय असल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले होते. चीनने त्यावर युनोच्या सुरक्षा परिषदेत शिक्कामोर्तब केले! आम्ही बरोबर होतो ना, अशी फुशारकी मारण्याचा वाव आता कॉँग्रेसला मिळाला नाही का! त्याने आनंदित नाही व्हायचे तर काय व्यथित व्हायचे! ‘देशाला वेदना होतात, तेव्हा कॉंग्रेसला का आनंद होतो’, असा प्रश्न यावेळी निरर्थक ठरतो!
 
तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९५५ मध्ये सर्व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातील मजकुराचा काही भाग उद्धृत करून चीनचे भूत नेहरूंनीच जागवले, असा आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला. ‘सुरक्षा परिषदेत भारत चीनची जागा घेईल, असे आपल्याला कळविण्यात आले असले, तरी तो प्रस्ताव आपण फेटाळला. चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य नसणे अयोग्य ठरले असते’, अशा आशयाचा मजकूर या पत्रात होता, असे जेटली यांनी सांगितले.
 
थोडक्यात काय, की चीनच्या अध्यक्षाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, असे विधान करून, या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी नव्याने उजेडात आणण्याची कॉंग्रेसने भाजपाला संधी दिली. नेहरूंच्या चीन-प्रेमाची उजळणी करण्याचे निमित्त दिले; त्याबद्दल खरे तर भाजपाने कॉंग्रेसशी वाद न घालता, त्या पक्षाला धन्यवाद द्यायला हवेत!
बाय द वे, कॉंग्रेसच्या विद्यमान सर्वोच्च नेत्याला सल्ला देणारे राजकीय सल्लागार भाजपानेच तर नेमले नाहीत! बूमरँग होणारे सल्ले देणार्‍यांबाबत अशा शंकेला वाव मिळू शकतो!