तेरा क्या होगा...?
   दिनांक :17-Mar-2019
शुभ बोल रे...
विनोद देशमुख
९८५०५८७६२२
 
हिंदी चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेला सिनेमा होता- शोले! एकसे एक संवाद हे शोलेचे वैशिष्ट्य राहिले. इतना सन्नाटा क्यूं है भाई... तुम्हारा नाम क्या है बसंती... अब गोली खा... वगैरे संवाद खूपच गाजले. एका प्रसंगात खलनायक गब्बरसिंग विचारतो- तेरा क्या होगा कालिया? नेमका हाच प्रश्न मला सध्या पडला आहे. पण वेगळ्या संदर्भात अन्‌ वेगळ्या स्वरूपात. निवडणुकीसाठी विविध पक्षांचे जे जोडतोडीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरून मला हा संवाद आठवला आणि विचारावेसे वाटत आहे- तेरा क्या होगा कॉंग्रेस!
 
चित्रच तसे आहे. नेहरू-गांधी घराण्याच्या कॉंग्रेसशी मैत्री करायला फारसे कोणी तयार असल्याचे दिसत नाही! एवढा जुना राष्ट्रीय पक्ष. पण छोटे प्रादेशिक पक्षही त्याला धुतकारत आहेत. उत्तर प्रदेशातच नव्हे, देशात कुठेही आम्ही कॉंग्रेससोबत बसणार नाही, असे बसपानेत्या मायावतींनी जाहीरच करून टाकले. राजधानी दिल्लीवर कब्जा असलेल्या आपने आपला हात आखडता घेतला. प्रकाश आंबेडकर-ओवैसी यांच्या वंचित बहुजन आघाडीने बिघाडीचा रस्ता धरला. ममता बॅनर्जींची त्रुणमूल कॉंग्रेस तर मुळावरच उठली आहे. माकपला हे नकोच असतात. मग यांच्यासोबत आहे कोण? देवेगौडांचा जनता दल आणि लालूंचा राजद. चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक हे सुभेदार तर स्वत:च्या गडात कोणाला शिरूच देत नाही. म्हणजे, कॉंग्रेसकडे मित्रांची वानवा आहे!
 
 
 
पण, प्रचार काय सुरू आहे? भाजपाचे मित्रपक्ष मोठ्या प्रमाणावर सोडून गेले. त्याचाच आनंद! स्वत:ची मोठी रेष ओढायची की विरोधकाची पुसण्यात समाधान मानायचे? उलट, भाजपाची मित्रशक्ती कमी झाल्याचा फायदा घेऊन स्वत:ची ताकद वाढवा ना. सोबत असलेले शरद पवारच तर सांभाळता येत नाही कॉंग्रेसला. नगर दक्षिण मतदारसंघात काय हाल झाले कॉंग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याचे! पवारांनी नाही मिळू दिली ना संधी. शेवटी विखेंना स्वत:चा मुलगा भाजपात पाठवावा लागला! (चर्चा तर अशी आहे की, उद्या स्वत: विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी तंबूत जाऊ शकतात) ही बेरीज की वजाबाकी? निवडणुकीच्या तोंडावर अशा घडामोडी झाल्या तर मोदींशी टक्कर कशी घेणार कॉंग्रेस!
 
प्रादेशिक पक्षांना खतपाणी घालण्याचे दुष्परिणाम कॉंग्रेसला आता भोगावे लागत आहेत, हे लक्षात येतय्‌ का कॉंग्रेसजनांच्या? राष्ट्रीय स्तरावर प्रबळ विरोधी पक्ष उभा राहू नये म्हणून प्रादेशिक अस्मितेला हवा कोणी दिली? शिवसेनेला सुरुवातीच्या काळात वसंतसेना म्हणायचे, हे किती लोकांना आठवते? तीच शिवसेना आता भाजपाच्या सोबतीने कॉंग्रेसला वारंवार आव्हान देत आहे ना! अशी दुरवस्था झालेली असतानाही, इतर सक्षम नेत्यांना पुढे करण्याऐवजी कॉंग्रेस नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेर यायला तयार नाही. सध्या तर आई, मुलगा, मुलगी असे तीन-तीन शिलेदार एकाच घरातील! त्यामुळेही असेल कदाचित, इतर पक्ष दुरावत चालले आहेत. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो - तेरा क्या और कैसे होगा कॉंग्रेस!