न्यूझीलंडमधील हल्ल्यात ७ भारतीयांचा मृत्यू
   दिनांक :17-Mar-2019
ख्राइस्टचर्च
 न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात ७ भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन भारतीय अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात ४९ जण ठार झाले असून, २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन नागरिकाने मुस्लिमांविषयीच्या रागातून हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
हैदराबादमध्ये राहणारे दोन जण गोळीबारात जखमी झाल्याची माहिती याआधी मिळाली होती. हैदराबादचे रहिवासी असलेल्या फरहाज अहसन, इम्रान अहमद खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच गुजरात आणि तेलंगणामधील तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. गोळीबार करताना माथेफिरुने फेसबुक लाइव्ह (ऑनलाइन) केल्याने हा गोळीबार लोकांना थेट पाहायला मिळाला.पंतप्रधान जासिंडा अर्डर्न यांनी हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे म्हंटले आहे. या गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमधील ९ भारतीय बेपत्ता झाले असल्याचे भारतीय दूतावासाने म्हंटले होते. ते गोळीबारात मरण पावले असावेत, असा अंदाज होता.
 गोळीबारानंतर ख्राइस्टचर्चमध्ये कोणाला येण्या-जाण्यास बंदी घातली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, माथेफिरूने खूपच जवळून गोळीबार केला. मृतात महिला व मुलांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले की, गोळीबार करणारा माथेफिरू हा उजव्या विचारसणीचा दहशतवादी आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लिमांचे जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे, त्याला विरोध करण्यासाठी त्याने गोळीबार केला असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकावर गोळीबाराचा आरोप आहे.