श्रद्धांजली वाहण्यासाठी लोटले संपूर्ण शहर
   दिनांक :17-Mar-2019
न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण देश धक्क्यातून सावरत होता. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अल नूर मशिदीच्या परिसरामध्ये संपूर्ण शहर लोटले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे फुले वाहण्याबरोबरच हाताने लिहिलेली पत्रे लिहून भावना व्यक्त केल्या. हा देश अजूनही सुरक्षित आहे, हेच मुस्लिम स्थलांतरितांना सांगण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचे नागरिक करत होते.
 
 
ख्राइस्टचर्चमधील अल नूर आणि लिनवूड या दोन मशिदींमध्ये हल्लेखोराने केलेल्या अमानुष हल्ल्यामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासासाठी पोलिसांनी परिसरात केलेली नाकाबंदी हटविण्यात आल्यानंतर नागरिक उत्स्फूर्तपणे येऊन मृतांना श्रद्धांजली वाहात होते.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेर्न या शनिवारी शहरात दाखल झाल्या. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचा स्कार्फ घातला होता. त्यांनी या हल्ल्यातून बचावलेल्यांची आणि बळी पडलेल्या नागरिकांची भेट घेतली. या हल्ल्यात तुर्की, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशियासह बहुतांश मुस्लिम देशांमधील नागरिक आहेत. त्या सर्वांना वकिलातींचा संपर्क साधून देण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.