धडा कुणी शिकवावा?
   दिनांक :17-Mar-2019
 
मंथन 
 
 भाऊ तोरसेकर 
 
 
राहुल गांधींपासून केजरीवालपर्यंत सगळे, भारतीय सैन्याच्या वा सुरक्षा दलाच्या कृतीवरही शंका घेतात आणि पाकिस्तानला मदत करतात. त्याचा अनेकांना संताप येतो आणि मग सरकार त्यांना धडा का शिकवत नाही, असाही प्रश्न विचारला जातो. सरकारला हे शक्य असते, तर टुकडे टुकडे टोळी इतकी मोकाट हिंडू-फिरू शकली नसती. हे सरकारला शक्य नसते, कारण सरकारला प्रत्येक गोष्ट कायद्याच्या मर्यादेत राहून करावी लागत असते. कुणालाही देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबता येत नाही किंवा गोळ्या घालून मारता येत नाही. निदान आजतरी तशी सुविधा मोदी सरकारला उपलब्ध नाही. जवाहरलाल नेहरू वा इंदिराजींच्या जमान्यात तशी सुविधा होती आणि त्यांनी अतिशय मुक्तपणे त्याचा वापर केला. हे भले त्यांच्या पणतू-नातवाला ठाऊक नसेल, पण त्याच पूर्वजांचे गोडवे गाणार्‍यांना पक्के ठाऊक आहे. इंदिराजींनी 70 च्या दशकात नक्षलवाद कसा मोडीत काढला किंवा  नेहरूंनी, काश्मिरात आझादी असा शब्द बोलणार्‍या शेख अब्दुल्लांना किती वर्षे तुरुंगात सडवलेले होते, ते वयोवृद्ध पत्रकार-नागरिकांना ठाऊक आहे. कारण, त्यांच्या गळ्यात मानवाधिकाराचे लोढणे बांधलेले नव्हते आणि राज्यसभेची बेडी त्यांच्या पायात नव्हती जे नरेंद्र मोदींच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. पण, म्हणून देशाला इजा करू शकणार्‍या अशा लोकांना धडा शिकवणे अशक्य अजीबात नाही. तो धडा सरकार मात्र शिकवू शकत नाही, तर ज्यांना अशा देशविरोधी वक्तव्ये किंवा कृतीचा राग येतो, त्यांना हा धडा शिकवणे सहजशक्य आहे. तो धडा मतदानातून शिकवता येत असतो. ऐन निवडणुकांच्या मोसमात जे देशाला घातक कृती वा वक्तव्ये करीत आहेत, त्यांना मतदानातून नामशेष व नामोहरम करणे सामान्य मतदाराच्या हाती आहे. कारण, ही सगळी मंडळी अखेर मतांची लाचार असतात. त्यांना मतातूनच धडा शिकवता येत असतो.
 
 
 
पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी भाजपाला वा एनडीएला सत्ता मिळवून दिली, असा दावा केला जातो. त्यात अजीबात तथ्य नाही. मोदींना सत्ता सामान्य मतदाराने मिळवून दिलेली होती. ज्या प्रकारे मनमोहन व सोनियांनी देशाचे दिवाळे वाजवले होते, त्यामुळे विचलित झालेल्या मतदारानेच देशात राजकीय क्रांती घडवली आणि सत्तांतराचा प्रयोग यशस्वी केला होता. तेव्हा त्याला हिंदुत्वाचे विजय मानले गेले. त्याचा अर्थ स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍यांना तरी कितीसा उमगला होता? लोकांनी, अयोध्येत मंदिर उभारले जावे म्हणून मते मोदींना दिली नव्हती, तर ऊठसूट हिंदूंना गुन्हेगार, दहशतवादी म्हणणार्‍यांना करोडो हिंदूंनी  धडा शिकवला होता. त्यांच्या हिंदूविरोधी भूमिकेला असे नाकारले, की राहुल गांधींना इटलीतली आजी विसरून देशाच्या कानाकोपर्‍यातील देवळांच्या पायर्‍या झिजवणे भाग पडलेले होते. कॉंग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करणारा अहवाल अन्थोनी समितीने सादर केला. त्यात, आपण हिंदूचे शत्रू ठरल्याने पराभूत झालो. अल्पसंख्यकांचा पक्ष, अशी कॉंग्रेसची प्रतिमाच आपल्याला बुडवून गेली, असा निष्कर्ष त्या समितीने काढला होता. ते सगळ्या जगाला दिसत होते आणि त्यावर कुणी कुठली कारवाई केलेली नव्हती. सत्ता कॉंग्रेसच्या हाती होती आणि हिंदूंना कुठेही दाद मिळणार नाही, असे वाटत होते. तेव्हा मोदी कुणाच्या मदतीला आलेले नव्हते, तर कोट्यवधी मतदारांनीच आपल्या बळावर त्या प्रश्नाचे उत्तर मतातून दिलेले होते. त्यातून राहुल गांधी धडा शिकले आणि रातोरात जानवेधारी हिंदू होऊन गेले. त्याचा अर्थच, जे आज कुणी पाकिस्तानधार्जिणे बोलत आहेत किंवा पाकला लाभदायक ठरेल अशी कृती करीत आहेत, त्यांना कायदा वा सरकार धडा शिकवू शकत नाही. तो धडा मतदार शिकवू शकतो. जो कुणी पाकप्रेमाने उचंबळला आहे, त्याला राजकारणात नामोहरम करणे, हाच त्यावरचा उत्तम उपाय किंवा धडा असू शकतो.
 
2014 ची निवडणूक हिंदूविरोधी बोलणार्‍यांना धडा शिकवण्यासाठीची होती, तशी 2019 ची निवडणूक देशविरोधी बोलणार्‍यांना धडा शिकवण्यासाठीची असेल. इतके जरी लक्षात घेतले, तरी मग या दिवाळखोरांना धडा कोण शिकवणार, असा प्रश्न मनात येणार नाही. कारण, त्याचे उत्तर आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत. आपल्याच हाती जी मताची शक्ती आहे किंवा अस्त्र आहे, त्याचा उपयोग अशा लोकांच्या विरोधात करण्यापासून आपल्याला कुणी रोखलेले नाही. शिवाय, हे सगळेच राजकीय पक्ष सत्तेचे व पर्यायाने मतांचे लाचार असल्याने त्यांना मतांची भाषा कळते. ऊठसूट, मुस्लिम अल्पसंख्यकांची मते कुठे जातील त्याची चर्चा चालते. कारण मुस्लिमांची मते एकगठ्‌ठा पडतात, हा अनुभव आहे. त्यामुळेच मुस्लिमांच्या धर्मभावना किंवा अन्य कुठल्याही श्रद्धांना धक्का लागू नये, याची प्रत्येक राजकारणी काळजी घेत असतो. त्याच्या उलट, हिंदूंना कुणीही, कशाही लाथा घालाव्यात किंवा शिव्याशाप द्यावेत, असा प्रघात आहे. 2014 नंतर तो काहीसा कमी झाला आहे. त्यामुळेच मग हिंदूंच्या ऐवजी देशाला वा राष्ट्रप्रेमाला शिव्याशाप सुरू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी जितक्या आवेशात हिंदूंना वा हिंदू धर्माला दोषी ठरवले जात होते, तितके आता होत नाही, कारण दुखावलेला हिंदू मतांनी मारतो, हे लक्षात आलेले आहे. मात्र, राष्ट्रप्रेमाला लाथा घातल्या म्हणून काही बिघडणार नाही, असा समज रूढ झाला आहे, यावेळी त्याला धडा शिकवावा लागणार आहे. बारकाईने बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल. आजकाल संघ, सैन्य, सरकारी संस्था किंवा राष्ट्रवाद यावर हल्ले होतात. कारण हिंदूंना बोलण्याचे धैर्य अशा टोळ्यांनी गमावले आहे. प्रत्यक्षात त्यांचे लक्ष्य हिंदूच आहे. कारण आता राष्ट्र म्हणजेच हिंदुत्व , हे सत्य अशा विरोधकांनीही स्वीकारलेले आहे. मग हिंदूंना खच्ची करायचे तर राष्ट्रप्रेम वा राष्ट्रभावनेला खिळखिळी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
 
जिहादी दहशतवादी वा पाकिस्तानविषयी आपुलकी आणि भारतीय सेनादलाचा द्वेष त्यातून आलेला आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीतून बगल देण्याची सोय असल्याने, अशा गुन्हेगारांना कायदा रोखू शकत नाही, की सरकार कारवाई करू शकत नाही. कायद्याच्या मर्यादा संभाळून ही हरामखोरी चाललेली असते. असे गुन्हे कोर्टात सिद्ध करणे अशक्य असल्याने गद्दारी उजळमाथ्याने चाललेली असते. त्यासाठी कायदे, राज्यघटना यांचाच आधार घेतला जात असतो. म्हणूनच सरकारचे हातही बांधलेले असतात. मात्र, मतदार वा जनता यांची शक्ती कायद्याच्या जंजाळात गुंतलेली नसते. तिला अशा लोकांना चोख उत्तर देता येते. तुम्ही भारतीय सेनेवर शंका घेता? तुम्ही पाकिस्तानधार्जिणे वागता? तुम्ही दहशतवादी जिहादला पाठीशी घालता? मग तुम्हाला मत नाही, असा बडगा मतदाराने उचलला तर त्याला कुणी कायदा आक्षेप घेऊ शकत नाही. गरिबी, शेतकरीसमस्या किंवा बेरोजगारी वगैरे प्रश्नांना पुढे करून मते मागायची आणि मते मिळाल्यावर मात्र देशद्रोही कारवायांची पाठराखण करायची, असा हा फसवेगिरीचा धंदा झालेला आहे. त्याला मतदार रोखू शकतो. मागील काही वर्षांत किंवा महिन्यात ज्यांनी देशप्रेमाची टवाळी केली वा पाकिस्तानला पूरक वक्तव्ये- भूमिका घेतल्या; त्यांना मत नाकारूनही भागणार नाही, तर असे लोक आपापल्या मतदारसंघात किंवा प्रभावक्षेत्रात पराभूत होतील, याची मतदाराने व्यवस्था केली, तरी यांना चांगला धडा शिकवला जाऊ शकतो. जसे मागील मतदानानंतर हिंदूंना दुखावणे संपुष्टात आले, तसेच मग नंतर राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेमाची हेटाळणी संपुष्टात येऊ शकते. ते काम कायद्याने होण्याची अपेक्षा गैरलागू आहे. आपापल्या भागात- जागी- देशविरोधी बकवास करणार्‍यांना संपवण्याचा चंग मतदाराने बांधावा. धडा शिकणारे शिकतील, पण शिकवणारे आपण पुढाकार घेणार आहोत काय?