इंडोनेशियातील पुरात ५० जणांचा मृत्यू
   दिनांक :18-Mar-2019
जयपुरा (इंडोनेशिया) :
इंडोनेशियाच्या पूर्व भागातील पापुआ प्रांतात आलेल्या भीषण पुरात सुमारे पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतुपो पुराओ निगुराहो यांनी दिली आहे.
 
 
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जयपुरा प्रांताची राजधानी सेंतानी जवळच्या खेड्यात भीषण पूर आला. पुरात आणि पुरामुळे झालेल्या भूस्खलानात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५९ जण जखमी झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली असून घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. भूस्खलन, चिखल, झाडे उन्मळून पडल्याने आणि घरांचे नुकसान झाल्याने एकूण नुकसानीचा आकडा वाढणार आहे. सखल भागातून पाणी काढून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुराच्या पाण्यामुळे आणि रस्त्यावर चिखल साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जयपुरा विमानतळावरील वहातूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. इंडोनेशियाला पावसाळ्याच्या दिवसात सतत पुराचा सामना करावा लागतो.