सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यास आमदारांचा तीव्र विरोध
   दिनांक :18-Mar-2019
कॉंग्रेस-राष्ट्रवादीत अनेक पक्षांना सोबत आणणार आणि भाजपाचा पराभव करणार, अशी स्वप्ने पाहणार्‍या या दोन्ही पक्षांपासून सर्वच घटक पक्ष दूर होत गेले. आता एकटे राजू शेट्टी तेवढे उरले आहेत.
राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले हा मतदारसंघ सोडण्यासाठी आघाडीचे दोन्ही पक्ष तयार झाले. पण, राजू शेट्टींनी अजून त्याला संमती दिलेली नाही. त्यांना तीन जागा हव्या होत्या आणि बुलढाण्याची जागा हवीच हवी होती. पण, तेथे राष्ट्रवादीने राजेंद्र णे यांचे नाव घोषित केल्यामुळे राजू शेट्टी यांचा तिळपापड झाला आहे. आता कॉंग्रेस म्हणते, सांगलीची जागा राजू शेट्टींना सोडण्यास आम्ही तयार आहोत. पण, स्थानिक आमदार आणि पदाधिकार्‍यांचा याला तीव्र विरोध आहे. त्यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठविले आहे व सांगलीची जागा मुळीच सोडू नये, अशी मागणी केली आहे. या पत्रावर आमदार विश्वजीत कदम, माजी खासदार प्रतीक पाटील, सांगली जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार मोहनराव कदम, सांगली कॉंग्रेस शहर कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अ. भा. कॉंग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी जयश्री पाटील व विशाल पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
 
 
सांगलीची जागा राजू शेट्टीला सोडण्याचा काही बड्या नेत्यांचा पवित्रा पाहून 10 मार्चला हे पत्र खरगे यांना पाठविण्यात आले आहे. पत्रात नमूद आहे की, स्वातंत्र्यानंतर जेवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यात सांगली आणि नंदुरबारमध्ये 2014 वगळता कधीच कॉंग्रेसचा पराभव झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला आघाडीत फक्त तीन जागा आल्या आहेत. त्यातील आणखी एक जागा दुसर्‍याला दिल्यास दोनच जागा उरतील आणि प. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची शक्ती आणखी कमी होईल. दुसरी बाब म्हणजे सांगली आणि सोलापूर या जागा कर्नाटकला लागून आहेत. सांगलीत कॉंग्रेस पक्ष अतिशय मजबूत आहे. अगदी ग्रामीण भागात तळागाळापासून कॉंग्रेसचे काम आहे. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक होती, याचेही स्मरण पत्रातून करून देण्यात आले आहे.
 
म्हणून सांगलीतील सर्व नेते, जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटी, सर्व आघाड्यांचे प्रमुख व कार्यकर्त्यांनी असा ठराव केला आहे की, सांगलीची जागा राष्ट्रवादी अथवा स्वाभिमानी शेतकरी संंघटनेला मुळीच देण्यात येऊ नये. असे झाले तर कॉंग्रेसची हमखास निवडून येणारी जागा आपण गमावून बसू.
 
सांगलीच्या जागेवरून स्थानिक आमदार आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे, हे या पत्रातून दिसून येते. राजू शेट्टीबद्दल एका समुहाचे मत मुळीच चांगले नाही. राजू शेट्टींनी उस शेतकर्‍यांचे वारंवार आंदोलन उभारून साखर कारखान्यांना कमकुवत करण्याचे काम केले आहे. शेट्टी हे स्वार्थी नेते आहेत. आता ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे हात पसरत आहेत. एवढीच ताकद त्यांच्यात असेल तर स्वबळावर त्यांनी हातकणंगले येथेच निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रामुख्याने साखर लॉबीतील प्रमुख पदाधिकारी बोलत आहेत. शेट्टींनी अवास्तव मागण्या करणे ही काही नवी गोष्ट नाही. भाजपापुढेही त्यांनी अवास्तव मागण्या केल्यामुळे त्यांना भाजपाने घरचा रस्ता दाखविला आहे. आता ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पाय धरायला निघाले आहेत, अशी टीका शेट्टींवर होत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे.
 
श्रेष्ठींनी कदाचित शेट्टींना सांगलीची जागा दिली, तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करणार नाहीत. नेमकी हीच भीती शेट्टींना सतावत आहे. त्यामुळे त्यांनी अजून होकार दिलेला नाही. कारण शेट्टींच्या गोटातून आजच सांगितले जात आहे की, आगामी विधानसभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी 20 जागा देणार असतील तरच लोकसभेत युती करावी. त्यामुळे आघाडीच्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांत आतापासूच चलबिचल सुरू झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपात जात आहेत. सुजय विखे पाटलांच्या भाजपा प्रवेशाने तर िंचतेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. पार्थ पवार यांना मावळची जागा दिली नसती, तर ते सुद्धा एखादवेळी भाजपात गेल्याचे दिसले असते. घरातील व्यक्ती अन्य पक्षात गेली असती, तर शरद पवारांवर प्रचंड टीका झाली असती. म्हणूनच त्यांना ऐनवेळी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा करावी लागली आणि तिकीट पार्थ पवार यांना द्यावे लागले.
 
काळ किती वेगाने बदलतो पाहा. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली तेव्हा वातावरण कसे आनंदाचे होते. आता 48 पैकी 40 जागा आघाडीच्या येणार असे उघडपणे बोलले जाऊ लागले होते. पण, काळ एवढ्या वेगाने पुढे सरकत गेला की, आता दोन्ही पक्षात जागावाटपावरून बेबनाव निर्माण झाला आहे. तिकडे अन्य पक्षांना शांत करण्याचे कामही करावे लागत आहे. यामुळे आघाडीतील कार्यकर्तेही कंटाळले आहेत. याद्या जाहीर होण्यास त्यामुळेच विलंब होत आहे. निवडणुका तोेंडावर आल्या असताना, अजून प्रचाराला प्रारंभ सुद्धा झालेला नाही.
 
तिकडे प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीने ताकास तूर लागू न देता आपले उमेदवारही घोषित करून टाकले आहेत. अॅड. प्रकाश यांच्या सौदेबाजी आणि धोकेबाजीचा अनुभव यापूर्वी अनेकदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. पण, कॉंग्रेसकडे वळणारी काही दलित-मुस्लिम मते कमी होण्याच्या िंचतेनेही आघाडीला ग्रासले आहे. आघाडीची ही स्थिती आहे. त्या तुलनेत, भाजपा-शिवसेनेची स्थिती त्यादृष्टीने बरीच म्हणावी लागेल. कारण, युतीत तेवढी धुसफूस राहिलेली नाही. आता वेळ आहे, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमीलन करण्याची. त्यांनी त्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावेही घेणे सुरू केले आहे. एकूणच आता शेट्टी हेच काय ते बाह्य पक्षीय नेते उरले आहेत. ते कोणता निर्णय घेतात, हे तेवढे पाहायचे.