झुकेरबर्गचा खोटारडेपणा उघड
   दिनांक :18-Mar-2019
लंडन,
 
कॅम्ब्रिज अॅनालिटिक या लंडनस्थित पॉलिटिकल कन्सलटन्सी कंपनीद्वारे या २०१८ मध्ये फेसबुक युझर्सचा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी चौकशी झाली आणि यासाठी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी, या घटनेची आपल्याला महिती नसल्याचे सांगून माफीही मागितली होती. पण, त्यांचा खोटारडेपणा आता चव्हाट्यावर आला आहे.
 
ब्रिटनमधील ऑब्झर्व्हर दैनिकाने याबाबतची सत्यता समोर आणली आहे. फेसबुकला या घटनेची संपूर्ण माहिती होती. यासाठी फेसबुकच्या संचालक मंडळाचे सदस्य मार्क आंद्रेसिन आणि कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचे अधिकारी क्रिस्तोफर वाईली यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या, असे या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.
 
 
 
 
या बैठकीत कॅम्ब्रिज अॅनालिटिका फेसबुकच्या युजर्स डेटाचा कशा प्रकारे आणि कसा वापर करेल, यावर चर्चा झाली होती. यानंतर अमेरिकन रेग्युलेटर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली.दरम्यान, फेसबुक आणि कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या अधिकार्‍यांमध्ये २०१६ मध्ये बैठक झाली होती. त्याचवेळी कॅम्ब्रिजने  अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे काम केले होते. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने वातावरण निर्मितीचा आरोपही या कंपनीवर आहे.
 
कॅम्ब्रिज अॅनालिटिकाद्वारे फेसबुकच्या सुमारे ८.७ कोटी युजर्सचा डेटा चोरी केल्याचा खुलासा झाला होता. या डेटा लीक प्रकरणाची चौकशी करणार्‍या फेडरल ट्रेड कमिशनच्या मते, फेसबुकने २०११ मध्ये तयार झालेल्या सेफगार्ड युजर्स प्रायव्हसीच्या नियमांचेही उल्लंघन होते.