निवडणुकीतील काळ्या पैशाच्यावापरावर आयकर विभागाची नजर
   दिनांक :18-Mar-2019
नागपूरच्या आयकर क्षेत्रात येणार्‍या ज्या काही मतदारसंघात लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यात काळ्या पैशाचा वापर करताना कुणी दिसून आल्यास त्याला आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नागपूर आयकर विभागाच्या क्षेत्रात विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त नाशिक आणि औरंगाबाद हेही जिल्हे येतात, हे येथे उल्लेखनीय.
 
 
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशाच्या होणार्‍या वापराला रोखण्यासाठी तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी आयकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयांना पत्र लिहून आपली सेवा देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार नागपूर आयकर क्षेत्राने तातडीने पावले उचलली असून, वरील नमूद मतदारसंघात जर कुणी काळ्या पैशाचा वापर करताना आढळल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई होणार आहे. यात मतदारांना पैसे वाटणे, विविध वस्तू देणे यासारख्या अवैध बाबींचा समावेश असून कोणतीही अशी बाब जी निवडणुकीवर प्रभाव टाकू शकेल, अशा सर्व बाबी या आयकर विभागाच्या कक्षेत येणार आहेत. अशा कारवाया करणारे आढळल्यास त्यांच्यावर आयकर कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
यासाठी आयकर विभागातर्फे प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) यांच्या कार्यालयात एक 24 तास सुरू राहणारा एक नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. आयकर विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, असे पैसे वाटणारे, वस्तू वाटणारे, मोठमोठ्या गिफ्ट देणार्‍या व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ टोल फ्री क्रमांक 1800-233-3785 यावर संपर्क करावा. व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक 9403391664 यावरही माहिती देता येईल. सोबतच 24 तास सुरू राहणार्‍या फॅक्स क्रमांक 0712-2525844 वरही माहिती देता येईल.
 
निवडणुका या निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात व्हाव्यात यासाठी नागरिकांनीही अशा अवैध कारवायांवर पाळत ठेवून त्याची माहिती तत्काळ कळवावी. तसेच नागरिकांना अशी माहिती कळली की, अमुक उमेदवाराजवळ मोठ्या रकमा, सोने, चांदी अथवा काळा पैसा आहे तर ती माहितीसुद्धा आयकर विभागाच्या वरील क्रमांकावर कळविता येईल. आयकर मुख्यालयाचे अन्वेषण विभागाचे उपसंचालक एम. अर्जुन मानिक यांनी ही माहिती जनहितार्थ जारी केली आहे.
सजग नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व काळा पैसा असणार्‍यांचा पर्दाफाश करावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.