पश्चिम महाराष्ट्रासाठी कोकणद्वार महत्त्वपूर्ण
   दिनांक :18-Mar-2019
 
 
76 हजार मतदार कोकण क्षेत्रातील
 
 
 राज्यात घाट प्रदेश म्हणजे पश्र्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सर्वच उमेदवारांचे भवितव्य कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघातील मतदारांवर असल्याचे दिसून येते. मावळ लोकसभा मतदार संघातील एकूण 19 लाख मतदारांपैकी दहा लाख 76 हजार मतदार कोकण विधानसभा मतदार संघातील आहेत. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून राष्ट्रवादीसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे.

 
 
लोकसभा मतदार संघ पुर्नरचनेनुसार राज्यात मावळ हा एक नवीन मतदार संघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचचवड, आणि पिंपपरी हे तीन विधानसभा मतदार संघ आणि कोकणातील कर्जत, पनवेल, आणि उरण या तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा लोकसभा मतदार संघ अनेकांना संभ्रमात टाकणारा आहे. भाषा, प्रांत आणि संस्कृतीबाबत भिन्न असलेले पश्र्चिम व कोकण हे दोन प्रदेश या मतदार संघामुळे एक आले आहेत. राज्यात अशा प्रकारची भौगोलिक रचना असलेला बहुधा हा एकच मतदार संघ आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उमेदवार घाटावरचा आणि सर्वाधिक मतदार कोकणातील असे चित्र आहे. दोन्ही निवडणुकीत या मतदार संघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार याला उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एक आले असल्याने मावळ मध्ये देखील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप महाआघाडी आहे. घाटावरच्या तीन विधानसभा मतदारसंघापेक्षा कोकणातील तीन मतदार संघावर राष्ट्रवादीची खरी मदार आहे. शिवसेना भाजपा युतीत ही जागा ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या वाट्याला आली असून पवार विरुध्द बारणे ही लढत निश्र्चित मानली गेली आहे. या दोन्ही उमेदवारांची खरी मदार ही कर्जत, पनवेल, आणि उरण मतदार संघावर आहे. मागील निवडणुकीत एकूण 43.62 टक्केवारीत 40 टक्के मतदान हे घाटाखालील तीन मतदार संघातील आहे.
 
रायगड आणि पुणे जिल्ह्यातील तीन तीन विधानसभा मतदार संघ मिळून तयार झालेल्या या मावळ प्रांत लोकसभा मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदार संघ पुर्नरचनेनंतर दोन्ही वेळा शिवसेनेने या ठिकाणी बाजी मारली आहे. कर्जत, पनवेल, उरण विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने नवीन मतदारही आलेला आहे.