...तर भीमा कोरेगावची पुनरावृत्ती!
   दिनांक :18-Mar-2019
 
 
 
उत्तरप्रदेशात भीम आर्मी नावाच्या संघटनेचा एक मुखिया आहे. त्याचे नाव आहे चंद्रशेखर. अलीकडे कॉंग्रेस पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला इन्शा अल्ला, कितने अफझल मारोगे, घर घर से अफझल निकलेगा...’ असे नारे देऊन भारताचे टुकडे पाडण्याची धमकी देणारा कन्हैयाकुमार, उमर खालीदसारखे नेते, नक्षलवादी हे एनजीओ आहेत, असे म्हणून हिंसा घडवून आणणारे शहरी नक्षलवादी, पोलिसांच्या हत्या करा, असे खुले आव्हान देणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल अशासारख्या लोकांच्या समर्थनाची गरज आहे. या सर्वांवर राष्ट्रविरोधी कारवायांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यात भर पडली आहे, या चंद्रशेखरची. हाही एक एनजीओ चालवतो. पण, सध्या अशाच नेत्यांची कॉंग्रेसला गरज आहे. उत्तरप्रदेशात बसपा-सपाने कॉंग्रेसला वार्‍यावर सोडून दिल्यामुळे, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी चंद्रशेखरसारख्या नेत्यांना हाताशी धरण्याचा विडाच उचललेला दिसतो. दलित-बहुजनांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करणारी भाषणे हा दिवटा चंद्रशेखर देत आहे. नुकतीच एक हुंकार रॅली दिल्लीत झाली. त्या रॅलीत कॉंग्रेस पक्षासह काही विरोधी नेतेही होते. शरद यादवही होते. या रॅलीत चंद्रशेखर म्हणाला, संविधानाला हात लावाल तर भीमा कोरेगावसारखी घटना पुन्हा घडवून आणू. या त्याच्या भाषणावर सर्वच कॉंग्रेसी नेते आणि शरद यादव यांनी टाळ्या वाजविल्या. हे सर्वविदितच आहे की, भीमा कोरेगाव दंगल ही नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रातील काही दलित नेत्यांना हाताशी धरून घडविली होती. त्या सभेला उमर खालीद, बी. जी. कोळसे, प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते.
 

 
 
भीमा कोरेगाव दंगल नक्षल्यांनी घडविल्याचे पुरावेही हाती लागले आहेत. अनेक लोकांना अटकही झाली आहे आणि त्यांच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. प्रश्न आहे, चंद्रशेखर नावाच्या या इसमाने दिलेल्या भीमा कोेरेगाव दंगल घडवून आणण्याच्या जाहीर धमकीचा. ही धमकी म्हणजे, कॉंग्रेसला अशा दंगली हव्या आहेत. विरोधी पक्षांनाही हव्या आहेत आणि नक्षलवाद्यांची पुन्हा मदत घेतली जाणार आहे. चंद्रशेखरच्या या विधानाची दखल उत्तरप्रदेश पोलिसांनी घेतली आहे. पुढे काय कारवाई होते ते बघायचे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी, चंद्रशेखरला अटक करून तुरुंगात डांबण्याची मागणी केली आहे. ती योग्यच आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना, अशा पद्धतीने हिंसाचाराच्या धमक्यांची निवडणूक आयोगाकडून काय दखल घेतली जाते, हेही पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
 
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेला एअर स्ट्राईक, त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे पाकिस्तानी लष्कराकडून पकडले जाणे आणि दोनच दिवसांत त्यांची मुक्तता होणे, या घटनांमुळे सध्या जनमानस ढवळून निघाले आहे. एअर स्ट्राईकचे पुरावे मागणार्‍या राहुल गांधी आणि विरोधी पक्षांची छी: थू: होत आहे. प्रामुख्याने नवमतदार तसेच युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची लाट उसळली आहे. या लाटेत आपण वाहून तर जाणार नाही ना, या भीतिपोटी आता कॉंग्रेस गुन्हेगारांना सोबत घेऊन दंगलीचा आधार घेत आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी दंगली घडविण्याचा काही पक्षांचा डाव असल्याची शक्यता आपल्या गुप्तवार्ता संस्था आणि विदेशी संस्थांनीही वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच सावध राहावे लागेल. अशा लोकांच्या डावाला मुळीच बळी पडता कामा नये. याच चंद्रशेखरने देवबंदमध्ये विनापरवानगी रॅली काढण्याचा प्रयत्न केला असता, आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्याला पोलिसांनी पकडून इस्पितळात नेले. तेथे राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका वाड्रा खासकरून चंद्रशेखरला भेटण्यासाठी आल्या आणि ‘‘युवकोंकी आवाज दबानेका प्रयास किया जा रहा हैं,’’ अशी प्रतिक्रिया दिली. आधी तर त्याने मायावती व अखिलेशला धडा शिकविण्याची धमकी दिली. नंतर प्रियांका त्याच्या कानात पुटपुटल्या- ‘‘मायावती और अखिलेश नही, मोदी को सबक सिखाना है...’’ असे हे आंबेडकरवादी नेते. स्वत:चे मत नाही, अक्कल नाही, दुसर्‍यांचे गुलाम बनण्यातच, स्वत:ला विकण्यातच ज्यांना स्वारस्य आहे, ते भीमा कोरेगावची पुनरावृत्तीची भाषा बोलत आहेत. ही धमकी देण्याचा कानमंत्र चंद्रशेखरला बहुधा कॉंग्रेसने दिला असावा, असा आरोप करण्यास जागा आहे. म्हणजे कॉंग्रेस निवडणूक जिंकण्यासाठी किती रसातळाला पोहोचू शकते, त्याचे हे ज्वलंत उदाहरण! कॉंग्रेसने हार्दिक पटेलला आपल्या पक्षात आश्रय दिलेला आहे.
 
जेएनयुमध्ये कन्हैयाकुमारसोबत डावी आघाडी समर्थित उपाध्यक्ष सहेला रशीद हीसुद्धा नारे देण्यात आघाडीवर होती. पण, तिच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले नसल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला गेला नाही. कन्हैया, उमर खालीद आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध मात्र गुन्हा नोंदविला गेला आहे. नुकतीच एक घडामोड झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील माजी आयपीएस अधिकारी शाह फैसल यांनी ‘जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट’ नावाचा नवा राजकीय पक्ष काढला आहे. काश्मिरात होणार्‍या हत्यांच्या विरोधात त्यांनी राजीनामा दिला होता. या नव्या पक्षाचे स्वरूप काय असेल, हे अजून पुढे आलेले नाही. पण, त्यांनी असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या युवकांसाठी हा मंच आहे. आम्हाला विकास हवा आहे. जोपर्यंत या राज्यात शांततापूर्ण वातावरण निर्माण होत नाही, तोपर्यंत या राज्याचा विकास होणार नाही. काश्मिरी पंडितांबद्दलही भाष्य करताना त्यांनी सांगितले की, ते आमच्या संस्कृतीचा अविभाज्य अंग आहेत आणि त्यांना खोर्‍यात पुन्हा आणायचे आहे. त्यांचे विचार सकृद्दर्शनी बरे वाटतात. पण, या राजकीय पक्षात जेएनयुची नेता सहेला रशीद हीसुद्धा आहे. उमर खालीद हाही काश्मीर खोर्‍यातच राहणारा आहे आणि ‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे नारे त्याने दिले होते. त्याला आणि कन्हैयाला जेव्हा अटक झाली, तेव्हा हीच सहेला रशीद घोषणा देणार्‍यांसोबत होती. देशातील अनेक मुस्लिम विद्यापीठे व महाविद्यालयांत जाऊन तिने प्रक्षोभक भाषणे दिली आहेत. अशा या सहेला रशीदला शाह फैसल यांनी कसे काय पक्षात घेतले, हे कळायला मार्ग नाही. पुढे काय घडते, ते दिसूनच येणार आहे.
 
मोदी सरकार एकीकडे पाकिस्तानच्या दहशतवादाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना, राहुल गांधी मात्र त्यांची खिल्ली उडवीत आहेत. त्यांना असे वाटते की, जनमत आपल्या विरोधात जाईल म्हणून ते आपल्या सैन्याच्या शौर्यावरही टीका करीत आहेत. पुलवामानंतर झालेल्या सर्व घटना पाहता जनमत भाजपाकडे झुकलेले दिसत आहे. म्हणून आता ते चंद्रशेखर, हार्दिक पटेल, कन्हैया, नक्षलवादी यांना हाताशी धरून समाजासमाजात वैर आणि असंतोष निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत. विकासाच्या मुद्यावर चकार शब्द काढण्याची राहुल आणि विरोधकांची हिंमत नाही. म्हणून ते आता हिंसाचाराचा आश्रय घेत आहेत. पण, जनता आता तेवढी अज्ञानी राहिलेली नाही. कोण खरे कोण खोटे, कोण देशाला पुढे नेऊ शकतो, विकास साधू शकतो, हे जनतेला कळले आहे. घोडामैदान जवळच आहे...