ओरे बाबा, दीदी...!
   दिनांक :18-Mar-2019
विनोद देशमुख/9850587622 
 
बंगालची ममता बॅनर्जी सध्या संपूर्ण भारताची दीदी आहे! लतादीदीनंतरची ही दुसरी राष्ट्रीय दीदी! पण, या दीदीचे नाव घेतले की आठवतो नसीरुद्दिन शहा. त्याचा एक गाजलेला सिनेमा होता- अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यूं आता है... त्याच चालीवर म्हणता येईल- ममता दीदीको गुस्सा क्यूं आता है...! याचे कारण, ममता दीदी नेहमी तावातच असते, संतप्त असते, कोणाची ना कोणाची खटाई काढत असते, कोणाशी तरी पंगा घेत असते. संताप हा दीदीचा स्थाई भाव दिसतो. त्यामुळे दीदीचे नाव घेतले की प्रत्येक बंगाली माणसाची पहिली प्रतिक्रिया असते- ओरे बाबा (म्हणजे, अरे बापरे !)
 

 
 
तिकडचे लोक दीदीला बंगालची वाघीण मानतात. चवताळलेली, झेप घेण्यास उत्सुक असलेली वाघीण. सध्या ही वाघीण पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि भाजपासह संघ परिवाराला टार्गेट करून आहे. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी दीदी सोडत नाही. गेली पाच वर्षे दीदीचा हाच कार्यक्रम आहे. आता तर निवडणूक आली. म्हणजे टीकाटिप्पणीचा हंगामच! दीदीने एक अस्त्र परवा मोदींवर सोडले. हिंम्मत असेल तर मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी. भीती वाटत असेल तर एकाऐवजी सर्व बेचाळीसही मतदारसंघात उभे राहावे, असे आव्हान दीदीने दिले. दीदीचा विक्षिप्तपणा किती वाढला, त्याचेच हे उदाहरण म्हणायला हवे. एकतर मोदींना याची गरज नाही. ते वाराणशीतून, गुजरातमधून किंवा त्यांच्या मर्जीने देशातून कोठूनही निवडणूक लढवू शकतात. त्यासाठी त्यांनी कोणाचे ऐकण्याची गरज नाही. आणि दीदीने त्यांना सल्ला देण्याचेही काही कारण नाही. दुसरे म्हणजे, एकदम बेचाळीस मतदारसंघात उभे राहण्यास सांगणे हास्यास्पद तर आहेच; पण लोकशाहीची थट्टाही आहे.
 
ममतादीदीने आपल्या राज्यात लोकशाही संपवून ठोकशाही सुरू केलेलीच आहे! तीन तपांची डाव्यांची दादागिरी दीदीने मध्ये मोडीत काढली, तेव्हा लोकांना मोठ्या आशा होत्या. परंतु गेल्या आठ वर्षातील अनुभव हा आहे की, गुंडगिरी तशीच कायम आहे. फक्त डाव्यांच्या जागी तृणमूलवाले आले, एवढाच काय तो फरक! इतर सर्व पक्षांचे लोक या पायी त्रस्त आहेत बघा.
आणि, स्वत: ममतादीदीबद्दल काय बोलायचे. त्या तर कोणाचे काही ऐकण्याच्या मन:स्थितीतच नसतात. खासदार असताना महिला विधेयकावरून त्यांनी भर लोकसभेत सपाच्या एका पुरुष खासदाराची गच्चीच पकडली होती. सोमनाथ चॅटर्जी सभापती असताना स्वत:च्या एका प्रस्तावाचे कागद त्यांनी सभागृहात भिरकावले. मंत्री म्हणून अटलबिहारी वाजपेयींचे इतके डोके खाल्ले की, अटलजींना दीदीच्या आईकडे तक्रार करावी लागली! प्रश्न आवडला नाही म्हणून टीव्ही शो मधून तरातरा बाहेर पडणारी मुख्यमंत्री, अशी नोंद त्यांच्या नावावर आहे.
 
बांगलादेशीयांच्या घुसखोरी प्रकरणात, केवळ मतांवर डोळा ठेवून ही दीदी चक्क देशविरोधी भूमिका घेत आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालताना स्वत:च्या पोलिस आयुक्तासाठी उपोषण करून दीदीने विक्रमच नोंदविला. अशी ही तिकडम दीदी उद्या खरंच पंतप्रधानपदावर पोहोचली तर भारताचे काय होईल हो!! पण, तसे होणे शक्य नाही. मोदी आणि अमित शाह यांनी दीदींची झोप उडवून दिल्यापासून त्यांना आता केवळ आपल्या राज्याची तेवढी चिंता लागली आहे. आपले काय होणार, या भीतीने त्यांना ग्रासून टाकले आहे. तर अशा या अफलातून दीदी!