एके काळचा बॉलिवूड स्टार आज आहे सिक्युरिटी गार्ड
   दिनांक :19-Mar-2019
 
 
बॉलिवूड या माया नगरीत रंकाचा राजा आणि राजाचा रंक होणे नवीन नाही. परंतु राजाचा जेव्हा रंक होतो आणि हे ज्याच्या सोबत घडतं त्याची परिस्थिती किती दयनीय असते याचे जिवंत उदाहरण रवी सिद्धू आहे. ब्लॅक फ्रायडे, गुलाल, पटियाला हाऊस, बेवकूफियाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे रवी सिद्धू यांच्यावर सध्या उदरनिर्वाहासाठी सिक्युरिटी गार्डची नोकरी करण्याची वेळ आली आहे. एके काळी मोठ्या पडद्यावर ज्याची ओळख एक कलाकार म्हणून होती, इंडस्ट्रीतल्या दिग्गजांसोबत उठबैस होती, आज त्याला मुंबईतल्या एका हाऊसिंग सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्डच्या नावाने हाक मारली जाते. नियतीचा फेरा म्हणा किंवा आणखी काही, पण रवी सिद्धू यांची दयनीय परिस्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे.
 

 
 
 
सवी सिद्धू यांची कथा फिल्म कम्पेनियन या युट्युब चॅनलवरील व्हिडिओवर ऐकायला मिळत आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये ते त्याच्या सध्याच्या जीवनाविषयी, त्याच्यावर सिक्युरीटी गार्ड बनण्याची वेळ का आली तसेच त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी सांगत आहेत. ते सांगतात, मी स्ट्रगल करत असताना अनुराग कश्यप यांच्यासोबत माझी ओळख झाली आणि मला पांच या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट त्यांचा देखील पहिलाच चित्रपट होता. काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर त्यांनी मला ब्लॅक फ्रायडे या चित्रपटात घेतले. या चित्रपटात मी कमिशनर समरा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर मी गुलाल या चित्रपटात काम केले. निखिल आडवाणी यांच्या पटियाला हाऊसमध्ये देखील मला खूप चांगली भूमिका साकारायला मिळाली.
 
 
 
बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशाविषयी ते सांगतात, मला कधीच काम मिळाले नाही असे झाले नाही. याउलट माझ्याकडे जास्त काम असल्याने मी काही चित्रपटांना नकार देत होतो. पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी शक्य होत नव्हते. याच कारणाने काही काळानंतर मला काम मिळणे बंद झाले आणि त्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली.
 
सवी सिद्धू सध्याच्या त्याच्या स्थितीविषयी सांगतात की, मी सध्या दिवसातील १२ तास एका हाऊसिंग सोसायटीमध्ये सिक्युरीटी गार्डचे काम करत आहे. कोणत्या निर्माता अथवा दिग्दर्शकाला भेटायला जायचे तर साधे बसचे देखील पैसे माझ्याकडे नाहीयेत. चित्रपट पाहाणे तर माझ्यासाठी स्वप्नच उरले आहे. चित्रपटांना मी खूप मिस करतोय, चित्रपट पाहावेत असे मला वाटते. पण माझी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. अश्या परिस्थितीतही ते आशावादी असून परत चित्रपटात आपण दिसू अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली.