फायदेशीर बदक पालन
   दिनांक :19-Mar-2019
 
 
 
शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुट पालनाकडे वळतात. परंतु कुक्कुट पालनाला पोषक हवामान नसतं अशा ठिकाणी बदक पालनाचा व्यवसाय उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो.मुख्यत्वे हा व्यवसाय अंडी आणि मांस उत्पादनासाठी केला जातो. त्यात बदकाच्या अंड्यांना मोठ्या हॉटेलमध्ये विशेष मागणी असते. त्यादृष्टीने काही उपयुक्त माहिती जाणून घ्यायला हवी. सर्वसाधारणपणे बदकाच्या जातींचं तीन गटात वर्गीकरण होतं.
 
1) मांस उत्पादनाकरता बदक पालनासाठी आयलेसबरी, पेकीन, रॉउन्स, मसकोव्होस, व्हाईट इंडियन रनर्स या जाती उपयुक्त ठरतात.
2) अंडी उत्पादनाकरता बदक पालनासाठी प्रामुख्याने खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज, काळे किंवा निळे ऑरिंपगटस आणि व्हाईट स्टनब्रिज आदी जातींचा समावेश होतो. यातील खाकी कॅम्पबेल अत्यंत विकसित जात असून त्याची बदकं वर्षासाठी 250 ते 300 अंडी देतात.
3) शोभेच्या बदकांसाठी बदक पालन: यात प्रामुख्याने टिल, विडजन, पीनटेल, पॉकहार्ड, करोलोना, शोव्हेलीअर या जातींचा समावेश होतो. ही बदकं अतिशय शोभिवंत असून ती सोनेरी, लाल, जांभळा, निळा, काळा, पांढरा, पिवळा आदी रंगाच्या छटांनी युक्त असतात.
 
बदलक पालनाच्या व्यवसायात एक दिवसाची पिलं आणून संगोपन करावं. साधारणपणे 20 ते 22 आठवड्याची झाल्यावर बदकं अंडी देण्यास सुरूवात करतात. एक वर्षात 275 ते 290 अंडी मिळतात. त्यामुळे सुरूवातीचा (अंड्यावर येईपर्यंत) सहा महिन्याचा कालावधी आणि एक वर्ष अंडी उत्पादन अशी 18 महिने बदकं ठेवावी. दिवसभर बदकं चरण्यास सोडावी. दिवसातून एकदा निरिक्षणाद्वारे आजारी बदकं वेगळी करावी.