मनोहर पर्रीकर : आधुनिक गोव्याचे शिल्पकार!
   दिनांक :19-Mar-2019
 
 
कटाक्ष 
 
 
गजानन निमदेव  
 
 
 
 गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च रोजी रात्री निधन झाले. एक सच्चा राजकारणी, प्रामाणिक नेता, सहृदयी कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. एखाद्या नेत्याचे निधन झाल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याकडे चांगलेच बोलले जाते. त्याच्या जाण्याने कसे नुकसान झाले आहे, याची चर्चा होते. पण, मनोहर पर्रीकर हे हयात असताना आणि मुख्यमंत्रिपदावर असतानाही त्यांच्याबाबतीत चांगलेच बोलले जायचे आणि आता त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून ज्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्यासुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी बाजू मांडणार्‍याच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या पर्रीकरांनी प्रारंभापासूनच सदाचारी वर्तणूक ठेवली आणि त्याच्या परिणामीच ते अल्पावधीत लोकप्रितेच्या शिखरावर पोहोचले, यात शंका नाही. 2017 साली जेव्हा गोवा विधानसभेची निवडणूक झाली आणि कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तेव्हा भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला आणि मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हा पर्रीकर आहेत म्हणून महाराष्ट्र गोमंतक पार्टी, अपक्ष आणि इतरांनी सरकारस्थापनेसाठी पािंठबा दिला. यावरूनच आपल्याला पर्रीकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची कल्पना यावी. भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपाने सरकारस्थापनेसाठी दावा केला तो पर्रीकरांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित असलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या पािंठब्यामुळेच, हे लक्षात घेतले, तर त्यांची महत्ताही आपल्या लक्षात येईल.
 

 
 
मनोहर पर्रीकर हे प्रामाणिक होते, सरळमार्गी होते, निष्कलंक होते, साधे होते, असे जे त्यांच्याबाबत आता बोलले जात आहे, तसे आयुष्य ते प्रत्यक्ष जगले आहेत. राजकारणात अशी माणसं सापडणं तसं दुर्मिळच! मनोहर पर्रीकर यांनी 2012 साली पेट्रोलचे भाव एकदम 11 रुपयांनी कमी केले आणि देशभरात ते ख्यातिप्राप्त झाले. सरकारचा महसूल कसा वाढेल याची काळजी मुख्यमंत्र्याने घ्यायचीच असते, पण जनतेला कमीत कमी त्रास होईल, यासाठीही झटायचे असते, हा त्यांच्या कामाचा मूलमंत्र होता. आपण जनतेचे पाईक आहोत, आपल्याला जनतेची कामं करण्यासाठी, त्यांचे जगणे सुकर करण्यासाठी कौल मिळाला आहे, याची जाणीव ठेवूनच पर्रीकर यांनी सातत्याने काम केले, हे विसरता यायचे नाही. देशाचे संरक्षणमंत्री झाल्यानंतर मनोहर पर्रीकर देशाच्या राजधानीत दिल्लीत गेले. पण, तिथे जाऊनही त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. त्यांचा साधेपणा, त्यांचा प्रामाणिकपणा कुठेही कमी झाला नाही. त्यांच्या विचारांतही बदल झाला नाही. आपल्याला देशहितासाठी काम करायचे आहे, हा निर्धार करूनच ते कामाला लागले आणि गोव्याला गरज होती तेव्हा पुन्हा स्वगृही परत आले आणि अखेरच्या क्षणापर्यंत गोव्याची, गोव्यातील जनतेची सेवा केली. स्वादुिंपडाचा कर्करोग झाला आहे, शरीराचे वजन कमी झाले आहे, नाकातोंडात नळ्या आहेत, अशाही अवस्थेत त्यांनी निष्ठेने काम केले. मांडवी नदीवरील पुलाच्या पाहणीसाठी जेव्हा ते नाकातल्या नळीसह पोहोचले होते, तेव्हा अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. अनेकदा त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचा वाह्यातपणा अनेकांनी केला. पण, मनाने कणखर असलेले पर्रीकर कधी डगमगले नाहीत. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. पण, दुर्दैवाने 17 मार्च रोजी काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि एक अतिशय संवेदनशील मनाचा प्रामाणिक नेता आपल्यापासून हिरावून नेला.
 
मनोहर पर्रीकरांचं मुंबईशी आणि महाराष्ट्राशी घट्‌ट असं नातं होतं. मुंबईतल्या पवई येथे असलेल्या आयआयटीमधून त्यांनी पदवी संपादन केली होती आणि आयआयटी पदवीधर असलेले ते देशातील पहिले आमदार ठरले होते! पदवीचं शिक्षण मुंबईत घेतल्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही स्वयंसेवक असल्याने त्यांचं मुबईत सातत्यानं येणं-जाणं असायचं. अगदी मुख्यमंत्रिपदावर असतानाही ते मुंबईला जात असत. मुंबईत आल्यानंतर ते मुख्यमंत्रिपद विसरून मित्रांसोबत मनसोक्त फिरत असत. मुंबईतल्या साधारण असलेल्या हॉटेलात जाऊन मिसळ-पाव, शिरा खाणं त्यांना आवडत असे. सगळा तामझाम विसरून ते मित्रांसोबत अगदी सामान्य माणसाप्रमाणं गप्पा मारत न्याहारीचा आस्वाद घेत असत. अनेकदा त्यांना कुणी ओळखतही नसे आणि एखाद् वेळी ओळखलंच आणि विचारलं की, तुम्ही गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर का? तर या प्रश्नाला ते हसत हसत नकारार्थी उत्तर द्यायचे. म्हणायचे, मी या ठिकाणी या लोकांचा मित्र म्हणून आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून नव्हे! कुठेही आपल्या पदाचा बडेजाव नाही की मस्ती नाही. एकदा एका कार्यक्रमाला त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं.
 
कार्यक्रमस्थळाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी सरकारी गाडी सोडून दिली, पोलिसांनाही मागेच थांबायला सांगितले आणि जिथे कार्यक्रम होता, त्या पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणार तोच त्यांना सुरक्षारक्षकाने अडविले. कुठे चालला आहात विचारले. मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे आणि आत आयोजित कार्यक्रमाला चाललो आहे, असे पर्रीकरांनी सांगताच तो सुरक्षारक्षक जोरजोराने हसू लागला. त्याला वाटलं, हा माणूस काहीतरीच सांगतोय. पण, तेवढ्यात आयोजकांचं लक्ष पर्रीकरांकडे गेलं आणि त्यांनी सगळं काही सांभाळून घेतलं. असं होतं पर्रीकरांचं मनमोहक, साधं-सरळ, ध्येयमार्गी व्यक्तिमत्त्व! आज ते आपल्यात नाहीत. पण, आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांच्यातील एक जरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, काही अंशी त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न केला, तरी समाजस्वास्थ्य सुधारेल, देश प्रगतिपथावर अग्रेसर होईल, यात शंका नाही! त्यांची आठवण म्हणून त्यांच्यासारखं जगण्याचा संकल्प केला, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
 
‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी,’ हा त्यांच्या जगण्याचा पाया होता. त्यांच्या अशा मजबूत पायामुळेच ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात. त्यांना सुटाबुटात राहणे आवडत नसे. खरेतर ते आयआयटीयन होते. उच्च शिक्षित असल्याने त्यांनी तसे राहणे गैर नव्हते. पण, त्यांना मात्र असे राहायला आवडत नसे. हाफ बाह्यांचा शर्ट, साधी पॅण्ट आणि पायात चप्पल असा पेहराव त्यांना आवडत असे. देशाचे संरक्षणमंत्री झाल्यावरही ते दिल्लीत असेच साधे राहिले. असे असले तरी त्यांच्यात कधीही कुठे न्यूनगंड जाणवला नाही. अशा साध्या पेहरावातही ते अतिशय आत्मविश्वासपूर्ण वागत होते आणि धाडसी निर्णय घेत होते. उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने 2016 साली जो ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता, त्यासाठीचा निर्णय पर्रीकरांनी संरक्षणमंत्री या नात्याने घेतला होता. तुम्ही काय पेहराव करता, तुम्ही कसे दिसता याला काहीही महत्त्व नसते, तुम्ही काय काम करता, देशहित डोळ्यांपुढे ठेवून कसे जनहितकारी निर्णय घेता, याला महत्त्व असते आणि ते प्रत्यक्ष कृतीने पर्रीकर यांनी अधोरेखित केले होते. देशातील जनता ही बाब कधीही विसरणार नाही. तसे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह आणि मनोहर पर्रीकर हे त्यांच्या साधेपणासाठीच ओळखले जातात. एकदा रमणसिंहांनी पर्रीकरांना विचारले की, तुम्ही गळाबंद टाय-सूट का घालत नाही? तेव्हा पर्रीकर असं म्हणाले होते की, गळाबंद टाय-सूट घातला की, फाशी लावून घेतल्यासारखं वाटतं. तर देशातील तरुणाईला आदर्श आणि लोकप्रिय वाटणार्‍या मोजक्या नेत्यांमध्ये समावेश राहिलेल्या मनोहर पर्रीकरांचं असं आपल्यातून जाणं, अनेकांना दु:खी करून गेलं आहे. देशाच्या राजकारणातलं मनोहारी व्यक्तिमत्त्व आपल्या चाहत्यांना दु:खसागरात लोटून अनंताच्या यात्रेला निघून गेलं आहे.
 
पणजीच्या कला अकादमीत त्यांचं पार्थिव काल सोमवारी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आधुनिक गोव्याच्या या शिल्पकाराला अखेरची मानवंदना देण्यासाठी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांनी गर्दी केली होती, यातच सगळं आलं! ज्यांचा भाजपाशी काही संबंध नाही, अशा असंख्य नेत्यांनी आधुनिक गोव्याच्या या शिल्पकाराचं अंतिम दर्शन घेतलं. अनेकांना तर अश्रू आवरता येत नव्हते. ही बाब पर्रीकरांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करणारी होती. पर्रीकरांच्या निधनानं शोकाकुल झालेल्या गोवेकरांनी यंदा शिमगोत्सव साजरा न करण्याचा घेतलेला निर्णयही त्यांच्या संवेदनशीलतेवर, सर्वसमावेशकतेवर मोहोर उमटवणारा मानला पाहिजे...