मुळ्याच्या नवनवीन जाती
   दिनांक :19-Mar-2019
मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मुळा हे एक महत्त्वाचे पीक आहे. हे थंड हवामानातील पीक असून त्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. परंतु उष्ण हवामानात वाढू शकणार्‍या मुळ्याच्या जाती विकसित करण्यात आल्यामुळे हे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात मुळ्याची लागवड केली जाते. वाढीला लागणार्‍या तापमानानुसार मुळ्याच्या
 
सुधारित जातींचे दोन प्रकार आहेत -
 
अ) शीत कटिबंधात येणार्‍या जाती : या प्रकारातील जाती झपाट्याने वाढून लवकर म्हणजे 25 ते 30 दिवसात काढणीस तयार होतात. या जातीची मुळे कमी तिखट असतात. या प्रकारातील खालील जाती भारतात चांगल्या येतात.
1) फ्रेंच ब्रेक फास्ट : ही लवकर येणारी जात असून बियांच्या लागवडीनंतर 26 दिवसात तयार होते. हा मुळा गोल, लाल, लहान, कोवळा असतो. तिखटपणा कमी असल्याने कच्चा खाण्यास उपयुक्त आहे.
2) व्हाईट आयसिकल : हा मुळा पांढरा, लहान, मऊ, सडपातळ आणि कमी तिखट असतो. बी पेरल्यानंतर 28 दिवसात काढणीला तयार होतो.
ब) उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात येणार्‍या जाती : या प्रकारातील मुळा जास्त तिखट असतो, उग्र दर्प असतो. हा उशिरा तयार होतो.
1) गणेश सिंथेटिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ही जात विकसित केली असून ती खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी चांगली आहे. या जातीचे मुळ्यांची लांबी 25 ते 30 सें.मी. आहे. मऊ असून त्यावर उपमुळे येत नाहीत. काढणीस उशीर झाल्यास यामध्ये पिठूळपणा येत नाही.
2) जॅपनीज व्हाईट : या जातीचे मुळे थंड हवामानात चांगले वाढतात. ते 30 ते 40 सें.मी. लांब असतात. पांढरे आणि कमी तिखट असतात. 45-50 दिवसात हे पीक तयार होते.ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात या जातीची लागवड करावी.
3) पुसा चेतकी : या जातीची लागवड जास्त तापमान असलेल्या भागात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात करावी. हा मुळा पांढरा, कमी तिखट असून पीक 40 ते 45 दिवसात तयार होते.
4) पुसा रेशमी : या जातीचे मुळे निमुळत्या आकाराचे, 30 ते 35 सें.मी. लांबीचे असतात. ही जात सप्टेंबर महिन्यात लागवडीस योग्य असते आणि 55 ते 60 दिवसात काढणीस तयार होते.