तिवशात ‘पाषाणभेद’ वनौषधीची लागवड
   दिनांक :19-Mar-2019
 
पारंपरिक शेतीतून अपेक्षित असे उत्पन्न शेतकर्‍यांच्या पदरात पडत नसल्याने, आता नावीन्यपूर्ण शेतीची कास शेतकरी धरू लागले आहेत. तिवसा येथील काही तरुणांनी श्रीलंका, ब्राझील देशाच्या धर्तीवर जगभरातून मागणी असलेल्या ‘पाषाणभेद’ या वनौषधी वनस्पतीची लागवड केली. केवळ एकरभर शेतात 14 हजार झाडे तयार करून कृषिक्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
 
विविध रोगांवर गुणकारी असलेल्या या पाषाणभेद वनस्पतीची लागवड ही जादा करून श्रीलंका, ब्राझीलसारख्या देशात केली जाते. या वनस्पतीची ‘मुळे’ हीच अत्यंत बहुगुणी असतात. त्यात औषधिगुणधर्म असल्याने ते कॅन्सर, हृदयरोग, दमा, रक्तदाब आदी आजारांवर उपयोगी ठरते. या वनस्पतीचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन, त्याचा सखोल अभ्यास करून येथील सुशिक्षित युवा शेतकरी हृषीकेश खाकसे यांनी आपल्या शेतात त्याची लागवड केली.
पाषाणभेद औषधी वनस्पतीची लागवड करण्याचा प्रयोग हा अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजारनंतर तिवसा येथे करण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण प्रयोगाची चर्चा सर्वदूर झाली असून, शेतकर्‍यांसह कृषी अधिकारी व शासकीय अधिकार्‍यांनी या नावीन्यपूर्ण शेतीला भेट देऊन पाहणी केली आहे.
 

 
 
कृषी विभागाच्या महत्त्वाकांक्षी ‘आत्मा’ योजनेच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना सन 2018-19 अंतर्गत, भानुदास महाराज सेंद्रिय शेती गटातील प्रगतशील शेतकरी हृषीकेश देवेंद्र खाकसे यांनी रबी हंगाम 2018 मध्ये पाषाणभेद या औषधी वनस्पतीची लागवड आपल्या शेतात केली. खाकसे यांनी 1 एकर शेतात ही पेरणी केली. हे पीक सहा महिन्यांचे असून एकरी 25 हजार रुपये खर्च व एकूण मिळकत 1 लाख रुपये अपेक्षित आहे.
 
पाषाणभेद वनस्पतीच्या मुळांमध्ये आढळणार्‍या बहुगुणकारी ‘फोर्सकोलीन’ नामक औषधी घटकाचा हृदयरोग, रक्तदाब, दमा, काचिंबदू, गचकर्ण व काही प्रकारच्या कर्करोगातील उपचारामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे या वनस्पतीच्या जगभरातील मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हृषीकेश खाकसे यांच्या शेतातील पाषाणभेद लागवड नावीन्यपूर्ण प्रक्षेत्रास अलीकडच्या काळात शेतकर्‍यांच्या भेटी वाढत असून, येत्या खरीप हंगामात परिसरात आणखी लागवड वाढीस लागण्याची शक्यता आहे.
  हेमंत निखाडे