मी इथेच आहे
   दिनांक :02-Mar-2019
अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेले संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज समाधिस्थ झाले. त्यांच्या सान्निध्यात असलेल्या भक्तांना हुरहूर वाटू लागली. भक्तीची वीणा झंकारत ठेवीत हा अवलिया निघून गेला. मठ ओकाबोका वाटू लागला. पण, भक्तांनी शेगावची वारी करणे सोडले नाही. या श्रेष्ठाच्या समाधीचे मनोभावे पूजन करून भक्त आपला नवस बोलू लागले, फेडू लागले. संतश्रेष्ठाच्या अस्तित्वाची पावती भक्तीचा मळा फुलवू लागली. सज्जनगडला संत रामदासांची- माझी काया आणि वाणी। गेली म्हणाल अंतःकरणी। परी मी आहे जगत्‌जीवनी। निरंतर।। अशी ओवी आहे याचे प्रत्यंतर शेगावी वारी करणार्‍या भक्तांना येऊ लागले. ही भक्तांची मांदियाळी वाढू लागली.

 
 
समाधिमंदिराचे बांधकाम संतश्रेष्ठ गजाननाच्या समोरच सुरू झाले होते. तेव्हा घडलेला चमत्कार. मंदिराचे बांधकाम सुरू असताना मिस्त्रीला घडीव दगड देत असताना मजुराचा तोल गेला. तो तीस फुटांवरून खाली पडला, पण त्याला काही लागले नाही. लोकांना वाटले होते त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडतील. धावत पळत येऊन लोक मजुराला विचारू लागले. हसत उठणारा मजूर म्हणाला, मजूर म्हणे लोकाला। माझा जेव्हा झोक गेला। तेव्हा एकाने धरले मला। पडता पडता करास।। पाय भूमीसी लागता क्षणी। तो न दिसला मजलागुनी। हे वृत्त ऐकोनी। लोक अवघे आनंदले।।
 
असाच चमत्कार रामनवमीच्या दिवशी घडला. मंदिरात श्रीरामजन्मासाठी भक्तांची गर्दी उसळलेली. त्या गर्दीत मंदिराच्या सभागृहात खांबाला आश्रय घेऊन जयपूरची राजपूत बाई उभी होती. सभागृहाचे काम सुरू असल्याने ते घडीव खांब उभे केलेले, ज्या खांबाच्या आश्रयाला ही बाई उभी होती तो खांब कोसळला. दहा-वीस जणांनी तो खांब अंगावरून काढला. त्या बाईची मुलेदेखील या खांबाखाली दबली होती, त्यांनाही लोकांनी काढून शेगावच्या लोबो डॉक्टरकडे नेले. बाईला आणि मुलांस काही इजा झाली नव्हती. संतश्रेष्ठ गजाननाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक प्रगल्भ होत गेली. तर, रामचंद्र पाटलाला एका गोसाव्याच्या रूपात महाराजांनी दर्शन दिले. अशा चमत्कारांची गणती करता येणार नाही. नभातील तारे जसे मोजता येत नाही, तसे हे चमत्कार. अवघ्या जगाला कर्मयोगाची दीक्षा देणार्‍या जगद्गुरू योगेश्वर श्रीकृष्णाचा गीता उपदेश आधुनिक काळात, मराठी भाषेत मांडणारे दुर्दम्य इच्छाशक्तीचे नरशार्दूल लोकमान्य टिळक यांना गीतारहस्य ग्रंथासाठी संतश्रेष्ठ गजानन महाराजांनी भाकरीचा प्रसाद दिला. ज्या प्रसादाच्या आधारावरच मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य साकारले. भावभक्तीसोबत कर्मभक्तीची दीक्षा या महाराष्ट्राला दिली.
 
शंभर वर्षांपूर्वी झालेल्या संताने महाराष्ट्राच्या मातीत भक्तीचा अंकुर रुजविला. आज विशाल वटवृक्षाच्या पारंब्या भूमीत सतत पुन्हा आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्ष निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. वाहणारा वारा या वृक्षाच्या पानांशी सलगी करता साद देत असतो- जय गजानन... जय गजानन... जय गजानन... फक्त ऐकणारे कान गजाननभक्तीने ओतप्रोत असलेल्या हृदयाचेच हवे!
सुहास प्रभाकर कुळकर्णी
९४२०६८६२२१