का नको युद्ध?
   दिनांक :02-Mar-2019
चौफेर 
सुनील कुहीकर 
पुलवामा घटनेतील चाळीस भारतीय जवानांची शहादत आणि बालकोट-चकोटीत दिले गेलेले त्याचे प्रत्युत्तर... एक सशक्त देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जी देदीप्यमान प्रतिमा साकारली, त्याचा अभिमान बाळगणार्‍यांच्या तुलनेत कथित ‘युद्धतज्ज्ञां’च्या एका नव्याच जमातीची पैदास गेल्या काही दिवसांत इथे उपजली आहे. पाकिस्तानने बोलणीची भाषा वापरल्यानंतर आपण युद्धाची ठिणगी पेटवणे कसे गैर आहे, याबाबत अक्कल पाजळण्यास ती जमात एव्हाना सिद्ध झाली आहे. युद्धनीती, युद्धाबाबतचे ऐतिहासिक दाखले सादर करत, अभ्यासक- चिंतकांच्या आविर्भावात त्याचे विश्लेषण आणि त्यायोगे युद्धाच्या दुष्परिणामांची गणितं जगासमोर मांडण्याची अहमहमिकाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. हे भारताचं दुर्दैव आहे की, स्वाभिमानाच्या तुलनेत लाचारी पत्करून शांततेचे गोडवे गाणारी जमात इथे अधिक प्रभावी आहे. आताही नेमकी तीच पोपटपंची चालली आहे सर्वदूर. दहशतवाद्यांची बालकोटातील प्रशिक्षण तळं उडवण्याची कारवाई, पुलवाम्यात त्यांनी घडवलेल्या हिंसाचाराला दिले गेलेले प्रत्युत्तर होते. ते अत्यावश्यक होते. केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर वैश्विक पातळीवर भारताच्या सामर्थ्याचे अन्‌ भूमिकेचेही दर्शन घडण्यासाठीही त्याचे वेगळे महत्त्व होते. याच्या नेमके उलट, पाकिस्तानने पुढच्या चोवीस तासात स्वत:चे विमान भारतीय हद्दीत घुसविण्याचा प्रयोग करून सार्‍या विश्वाच्या साक्षीने स्वत:चे हसे करून घेतले, अपरिपक्वतेचे सार्वजनिक प्रदर्शन केले... दोन देशांतल्या बोलणीची गरज तर इम्रान खान यांना त्यानंतर सुचली आहे. त्यापूर्वी अमेरिका, चीन अशा कोणी कोणी, किती कितीवेळा त्याची कानउघाडणी केली कुणास ठाऊक, पण इम्रान यांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे कारण त्यात दडले आहे.
 
 
 
जणूकाय भारताला युद्धाची खुमखुमी आहे आणि पाकिस्तान तर जणूकाय जगभरात शांतता नांदावी यासाठीच प्रयत्नशील आहे, अशा थाटातली विधाने तमाम शहाण्यांकडून प्रसृत होऊ लागली आहेत. त्यातही वेदनादायक हे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांचाही त्याला अपवाद नाही. दोन्ही देशांनी आततायीपणा न करता शांतीच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देऊन मोकळे झालेत साहेब! कोणाला देताहेत डॉ. मनमोहनिंसग हा सल्ला? भारताला? भारताने आततायीपणा केला चकोटी- बालकोटमध्ये? अरे, २६/११ च्या हल्ल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे होतं असं चोख उत्तर पाकिस्तानला! पुन्हा हिंमत झाली नसती त्याची भारताकडे मान वर करून बघण्याची. पण, तुम्ही तर कायम शांतीचे पांढरे निशाण फडकावत राहिलात. त्याचे परिणाम सारा देश भोगतोय्‌ आज. भारत काय हल्लेखोर आहे? अरे, युद्ध जिंकून काबीज केलेला रावळिंपडीपर्यंतचा भाग पाकिस्तानला परत करण्याची दानत आहे या देशाची. २६/११ च्या हल्ल्यानंतरही स्वत:चीच लाज झाकत, जगापुढे पुरावे सादर करीत राहिलो आम्ही. हल्लेखोर कसाबला त्याची बाजू मांडता यावी म्हणून न्यायालयात भारताचे वकील उभे केलेत आम्ही. अजून काय करायला पाहिजे हो, शांतीची बूज राखण्यासाठी? पुलवामा घटनेनंतर तरी काय करायला पाहिजे होते भारताने? आर्जवं करायला हवी होती, की विनवण्या करायला हव्या होत्या दहशतवाद्यांना, की नका मारू आमच्या जवानांना या पद्धतीने म्हणून!
 
या जगाला ‘इट का जवाब पत्थरसे’ दिला तरच त्याचे महत्त्व कळते. ९/११ नंतर अमेरिकेने ज्या तर्‍हेने लादेनला ठेचला अन्‌ जगादेखत त्याच्या चिंधड्या उडवल्या, तीच भाषा कळते दहशतवाद्यांना. युद्धखोरी हा भारताचा स्वभाव नाही. तो तर भारतीयांचाही स्वभाव नाही. युद्धाच्या दुष्परिणामांची त्याला कल्पना नाही, असेही नाही. त्याची त्याला पर्वा नाही, असे तर मुळीच नाही. युद्ध कुणालाच परवडणारे नसते, ती एक न संपणारी प्रक्रिया असते, हे इम्रान खान अन्‌ भारतातल्या काही दीडशहाण्यांना जसे ठाऊक आहे, तसेच सर्वसामान्य भारतीयांनाही त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यांनातरी कुठे हवे आहे युद्ध? इतकेच कशाला, सीरियात ज्या जिहादाच्या नावे बंदुकी ताणून दहशत पसरवली जाते ना, रोजरोजच्या त्या दहशतीला तर तिथले मुस्लिमही कंटाळले आहेत. नको तो जिहाद, म्हणत तो देश सोडून इतरत्र आसरा शोधण्याच्या भूमिकेपर्यंत आले आहेत ते.
 
त्यामुळे पहिल्या, दुसर्‍या महायुद्धाचे दाखले देत युद्धाच्या दुष्परिणामांचा पाढा वाचण्याच्या भानगडीत कुणी नाही पडले तरी बिघडणार नाही इथे कुणाचेच काही. परवा पाकिस्तानच्या संसदेत भाषण करताना तिथल्या पंतप्रधानांनीही शांती आणि अमनचे जे गोडवे गायिले, अफगाणिस्तानादी देशातील विद्यमान परिस्थितीची उदाहरणे देत, युद्धातून कुणाच्याच्या हाती काही लागत नसल्याचे शहाणपण त्यांनी शिकवले, त्याची जाणीव त्यांनी दहशतवाद्यांना पोसतानाही बाळगली पाहिजे. तसे घडले तर कित्येक प्रश्न विनासायास सुटतील. भारतात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या की दरवेळी पुरावे मागायचे, आपला सहभाग नसल्याचे सांगत सुटायचे, भारत अकारण आपली बदनामी करीत असल्याचा कांगावा करायचा अन्‌ २६/११ च्या घटनेतील पाकिस्तानचा उघड सहभाग जगजाहीर झाला की मात्र मूग गिळून गप्प बसायचे. तरी बरं, आश्रय घ्यायला लादेनलाही पाकिस्तानच गवसला होता या भूतलावर... तरीही ते शहाणे त्यांचा दहशतवादाला पािंठबा नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. भारतातले काही दीडशहाणेही विश्वास ठेवतात त्यांच्यावर. पाकिस्तानची ही तर्‍हा कुठवर सहन करायची याचाच फक्त विचार होण्याची गरज आहे आता. कारण, एकवेळ पंतप्रधान इम्रान खानच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून त्यांच्या शांतिधोरणावर फुलं उधळायची म्हटलं, तरी जे इम्रान यांना वाटते नेमके तेच पाकिस्तानी सैन्यालाही वाटते काय, हा खरा प्रश्न आहे... कारण त्यांना जर तसे वाटत नसेल, तर इम्रान खान यांच्या या शहाणपणालाही अर्थ उरत नाही.
 
पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर संतापाची लाट कितीही तीव्र असली, तरी भारताने लागलीच उद्यापासून युद्ध सुरू करावे, असे कोणीही म्हणत नाहीय्‌ इथे. किंबहुना युद्ध व्हावेच, अशीही कुणाची टोकाची भूमिका नाही. जनतेचे एकवेळ जाऊ द्या, पण कारभार चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनाही युद्धाच्या गंभीर दुष्परिणामांची कल्पना नाही असे असे थोडीच आहे. पण, सरकार जणू युद्ध करायलाच मैदानात उतरले असल्याच्या थाटात, त्याला त्यापासून रोखणारी जमात मात्र नक्राश्रू ढाळायला नको तितकी सरसावली आहे. काहींनी तर युद्धनीती आणि राजकीय चातुर्याबाबत ज्याचा आदर्श ठेवला पाहिजे, त्या इस्रायललाही युद्धखोर ठरवून टाकले आहे या नादात. मुस्लिम आणि दहशतवादी घटकांनी एकट्याने घेरून जे दाहक वास्तव वाट्याला आणले, त्यातून शेकडोंच्या संख्येत ज्यू नागरिक गमावण्याची वेळ आली... इस्रायलच्या वाट्याला आलेल्या या भयाण यातना ज्यांना कधी भोगाव्या लागल्या नाहीत, केवळ ती आणि ती मंडळीच, इस्रायलने त्या आक्रमणांना ताठ मानेने दिलेल्या उत्तराला युद्धखोरीच्या तराजूत तोलू शकते. एरवी तो इस्रायलचा स्वाभिमान ठरतो अन्‌ हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा त्याचा अधिकारही... पण करता काय, देशाभिमान गहाण टाकून शांतीच्या पारड्यात मतं टाकणारी मंडळी तमाशाचा फड मांडून बसलीय्‌ इथे. युद्ध नकोची भाषा तिच्या तोंडी आहे.
 
जणू जगात शांतता नांदविण्याची जबाबदारी नियतीने त्यांच्याच खांद्यावर टाकली असल्यागत तोरा आहे त्यांचा. तीच मंडळी आता युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा उच्चरवात करते आहे. यातून आपण आपल्याच देशाची नाहक बदनामी चालवली असल्याची खंत त्यांच्या चेहर्‍यावर झळकत नाही. पाकिस्तान बोलणीची भाषा बोलू लागलाय्‌ ना, बस्स झालं तर! बालकोटमध्ये भारताच्या शक्तीचे प्रदर्शन घडले ना. बस तर मग, पुरे झाले आता...अशी त्यांची भूमिका आहे.
 
भगवान श्रीकृष्णालातरी कुठे हवा होता महाभारताचा संग्राम? युद्ध टाळण्याचे प्रयत्न त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत केलेत, हे कोणाला नाकारता येईल? संपूर्ण राज्याची मागणी टाळून पाच गावांवर समाधान मानण्याची भूमिकाही युद्ध टाळण्यासाठीच होती. जेव्हा बोटाच्या अग्रभागाएवढीही जमीन न देण्याची अरेरावीची भाषा बोलली जाऊ लागली, युद्धाचे रणशिंग तेव्हा फुंकले गेले. मग परिणामांची चिंता नाही वाहिली भगवंतांनी. त्यामुळे, महाभारतातील महासंग्राम हा कौरवांच्या दुराग्रहाचा परिपाक होता. तो समंजस पांडवांना कमकुवत ठरवण्याचाही परिणाम होता... म्हणूनच ते युद्ध शेवटी कौरवांचा नायनाट करूनच थांबलं... शांतिवार्तेची संधी तर वारंवार येईल भविष्यात. भारताला स्वत:ची धमक सिद्ध करण्याची संधी थोडीच वारंवार येणार आहे...?