पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दरांचे वाजले की बारा
   दिनांक :02-Mar-2019

आयुष्याचा माइलस्टोन असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी सुरुवात झाली. यात नागपूर विभागातून १ लाख ६८ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पहिल्याच दिवशी नागपूर विभागात बारा कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. तर काही परीक्षा केंद्रांवर हॉल तिकीटमध्ये त्रुटी आढळल्या.

 

 
 

पहिल्या दिवशी प्रथम भाषेचा पेपर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत झाला. शहरात सुरू असलेले मेट्रोचे काम आणि सिमेंटीकरण यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. शहरातील या निर्माणकार्यांचा विचारकरता विद्यार्थी एक तासापूर्वीच परीक्षा केंद्रांवर पोहोचले. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बोर्डाने ४५ भरारी पथकांसह ११ स्कॉड्स तयार केले आहेत.

 

दरम्यान, पथकाच्या तपासणीत बारा कॉपीबहाद्दर आढळले. भंडारा येथे सर्वाधिक दहा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. बोर्डाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकीटमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी आढळल्या. तक्रारींमध्ये विद्यार्थ्याचे जेंडर बदलविणे आदींचा समावेश होता. यंदा बोर्डाने ए-४ आकाराचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना दिले आहे. पूर्वी लहान आकाराचे हॉल तिकीट असायचे. ते हाताळणे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होते. पण नवीन मोठ्या आकाराचे हॉल तिकीट लॅमिनेशन करून हाताळणे विद्यार्थ्यांना त्रासदायक असल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली. याबाबत बोर्डाने स्पष्टीकरण देताना शाळेच्या चुकीमुळे काही हॉल तिकीटमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांसाठीदेखील महत्त्वपूर्ण असते. परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांवरही दिसून आले. विद्यार्थ्यांना स्वत: पालक परीक्षा केंद्रापर्यंत सोडायला आले होते. तर काही पालक पेपर होईपर्यंत प्रतीक्षा करताना दिसून आले. बोर्डाने विद्यार्थ्यांवरील तणाव कमी करण्यासाठी समुपदेशन करण्याच्या उद्देशाने पेपर सुरू होण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना प्रवेश दिला. विद्यार्थ्यांना मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेण्यास बंदी होती. तर विद्यार्थ्यांसमक्ष प्रश्नपत्रिकांचे पॅकेट उघडण्यात आले.