मुंबई विमानतळावर धमकीचा दूरध्वनी, कडेकोट सुरक्षा
   दिनांक :02-Mar-2019
मुंबई:
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी धमकीचा दूरध्वनी आल्याने एकच खळबळ माजली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल - २ वरील तीन मजले या कॉलनंतर रिकामे करण्यात आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आलेला हा कॉल बनावट असल्याचे नंतर चौकशीअंती स्पष्ट झाले. मात्र जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात असलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची सावधगिरी बाळगण्यात येत आहे.
 
 
धमकीच्या दूरध्वनीचा तपास करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली. सावधगिरीचा उपाय म्हणून टर्मिनल - २ इमारतीतील चौथा, तिसरा आणि दुसरा मजला रिक्त करण्यात आले, अशी माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, नागरी हवाई सुरक्षा ब्युरोने (BCAS)विमानतळ, विमाने आणि अन्य हवाई कंपन्याना सुरक्षेसंदर्भातली मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात टर्मिनल आणि अन्य भागात अॅक्सेस नियंत्रणावर निर्बंध, प्रवाशांची तपासणी, त्यांच्याकडील सामानाची तपासणी, विमानतळावर येणाऱ्या गाड्यांची काटेकोर तपासणी आदीचा समावेश आहे.