पूजाला सुवर्ण, साक्षीला रौप्य
   दिनांक :02-Mar-2019
नवी दिल्ली: बल्गेरियाच्या रूस येथे सुरु असलेल्या डान कोलोव्ह-निकोल पेत्रोव्ह कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीगीरांनी एका सुवर्णपदकासह चार पदके पटकावलीत व आणखी एक पदक सुनिश्चित केले आहे. पूजा धांडाने सुवर्णपदक, रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
पुरुषांच्या ६१ किग्रॅ वजनगटात भारताच्या संदीप तोमरने रौप्यपदक मिळविले. आशियाड सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनिया पुरुषांच्या ६५ किग्रॅ वजनगटाच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरविरुद्ध झुंजणार आहे. त्यामुळे भारताला आणखी एक सुवर्ण िंकवा रौप्यपदक मिळणे सुनिश्चित आहे.
 

 
 
राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविलेल्या गेलेल्या या स्पर्धेत महिलांच्या ५९ किग्रॅ वजनगटात पूजा धांडा अपराजित राहिली. यादरम्यान तिने आपलीच संघमैत्रीण सरिता मोर हिच्यावरसुद्धा मात केली. तिच्यासमोर किर्गीस्तानच्या अईसुलु तायनीबेकोव्हा व लिथुनियाच्या कॉर्नीलिजा झायसेव्हॅकूट यांचाही टिकाव लागला नाही.
 
महिलांच्या ६५ किग्रॅ वजनगटात साक्षी मलिकला स्वीडनच्या हिना जोहान्सनकडून पराभवाचा सामना करावा लागला.
संदीप तोमरसाठी पुरुषांची ६१ किग्रॅची अंतिम लढत अतिशय निराशाजनक राहिली. कझाकस्तानच्या नुरीस्लाम सानयेव्हने अवघ्या ३४ सेकंदात तोमरला १०-१ ने पराभूत केले. पुरुषांच्या ७४ किग्रॅ वजनगटात जितेंदर व विनोद कुमार हे अनुक्रमे जॉर्डन बरॉज व इव्हान कुस्याक यांच्याकडून पराभूत झालेत. महिलांच्या ५३ किग्रॅ वजनगटात विनेश फोगाट व सीमा बिस्ला, तर पुरुषांच्या ८६ किग्रॅ वजनगटात दीपक पुनिया आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहेत.