पुलवामा हल्ल्यात जैशचा हात नाहीच
   दिनांक :02-Mar-2019
पुरावे देऊनही पाकच्या मुजोर्‍या कायम
 
इस्लामाबाद,
 पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचे ठोस पुरावे भारताने सोपविल्यानंतरही, पाकिस्तानने मात्र सवयीप्रमाणे, या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा हात नसल्याचा दावा करीत, आपला दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा दाखविला आहे.
  
  
आम्हाला युद्ध नको, शांतता हवी. भारताने जैश आणि मसूदविरोधात ठोस पुरावे दिल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. त्याच दिवशी भारताने पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायोगाकडे आवश्यक ते सर्वच पुरावे सोपविले. या पुराव्यांची कुठलीही शहानिशा न करता, कुरेशी यांनी, या हल्ल्यामागे जैश आणि मसूदचा हात नसल्याचा दावा करून टाकला.
 
एका िंहदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुरेशी यांनी जैश आणि त्याच्या म्होरक्याचा बचाव करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली आहे, याकडे पत्रकाराने लक्ष वेधले असता, जैशने हे कृत्य केले नाही. आमच्या काही लोकांनी जैशकडे विचारणा केली, मात्र त्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला, दावा त्यांनी केला, तथापि, जैशसोबत कुणी संपर्क साधला होता, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
 
भारत आणि पाकमधील तणावावर युद्ध हा पर्याय नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्र डागल्याने समस्या सुटणार नाही. युद्ध हे आत्मघाती पाऊल ठरू शकते, असेही ते म्हणाले.