मराठी करोडपतीचे सूत्रसंचालन करणार मंजुळे
   दिनांक :02-Mar-2019
सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या हिंदी रिअॅलिटी शोच्या धर्तीवर आता मराठीतही 'कोण होणार करोडपती' हा शो येत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या खुर्चीत बसणार आहेत.

 
 
सोनी मराठी चॅनेलवर हा शो सुरू होणार असून चॅनेलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्याचा व्हिडिओ टीझर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडिओत नागराज मंजुळे सूत्रसंचालकाच्या खुर्चीवर बसताना दिसत आहेत. हा शो नेमका कधी सुरू होणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
हिंदी 'केबीसी'मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. अमिताभ यांचा भारदस्त आवाज, सहभागी स्पर्धकांशी त्यांचा होणारा संवाद, प्रत्येक नव्या प्रश्नाबरोबर वाढणारी उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखा-लाखांची बक्षिसं यामुळं या कार्यक्रमानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर मंजुळे यांचा नवा शो प्रेक्षकांच्या मनाची किती पकड घेतो, याबाबत आता उत्सुकता आहे.