इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या!- पाक संसदेत प्रस्ताव
   दिनांक :02-Mar-2019
इस्लामाबाद,
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाऊल उचलल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तान सरकारने शुक्रवारी केली. तसा प्रस्तावच पाकच्या संसदेत मांडण्यात आला. दहशतवाद्यांना पाठीशी घालणार्‍या, जम्मू-काश्मीर सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या आणि भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवणार्‍या पाकिस्तानने जागतिक रोषापासून वाचण्यासाठी ही नवी खेळी केली आहे.
 
 
 
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानपुरस्कृत जैश ए मोहम्मदचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय हवाई दलाने कारवाई करून तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या हद्दीत लढाऊ विमाने घुसवून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न हाणून पाडताना भारताचे लढाऊ मिग विमान गुलाम काश्मीरमध्ये कोसळले. या विमानातील वैमानिक िंवग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले होते. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे भारताकडून लष्करी कारवाईची शक्यता होती. पंतप्रधान मोदी यांनी तसे संकेतही दिले होते. त्यामुळे बिथरलेल्या इम्रान खान यांनी शांततेचे आवाहन करीत, वर्तमान यांना सोडण्याची घोषणा केली.
 
वास्तविक, भारताची संभाव्य कारवाई आणि जागतिक दबावापुढे झुकून, पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली. मात्र, पाकिस्तान त्याला वेगळा मुलामा देण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही देशातील शांततेसाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी हे पाऊल उचलल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. पाकचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत प्रस्ताव आणताना हीच भूमिका मांडली. पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी दाखवलेली तत्परता प्रशंसनीय आहे, असे वर्णन चौधरी यांनी शुक्रवारी केले. पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांना नोबेल देण्याचा प्रस्ताव येत असतानाच, सीमेवर पाक लष्कराकडून गोळीबार सुरू होता, हे विशेष!