यापुढे भारतविरोधात पाकच्या भूमीचा वापर नाही -शाह मेहमूद कुरेशी यांची घोषणा
   दिनांक :02-Mar-2019
इस्लामाबाद,
यापुढे भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ दिला जाणार नाही, अशी घोषणा पाकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी आज शनिवारी केली. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा आम्ही पूर्णपणे ताबा घेतला असल्याची माहितीही कुरेशी यांनी यावेळी दिली.
 
 
 
पुलवामा हल्ल्यात जैशचाच हात असल्याच्या पुराव्यांचे डोझियर भारताकडून आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यांचा आम्ही अभ्यास करीत आहोत. यावर चर्चा करण्याची भारताची इच्छा असल्यास आम्ही स्वागतच करू, असे कुरेशी म्हणाले. पाकिस्तानमध्ये आता नवीन सरकार आले, या सरकारची मानसिकता, दृष्टीकोन आणि धोरणेही नवीन आहेत, असे सांगताना, यापुढे भारत आणि अन्य कोणत्याही देशाविरोधात कोणताही दहशतवादी गट आमच्या भूमीचा वापर करू शकणार नाही आणि आम्ही तशी परवानगीही देणार नाही, अशी ग्वाही कुरेशी यांनी दिली.
 
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशनेच घेतली असल्याचे भारताच्या पुराव्यांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे, पण आम्हाला याविषयी शंका आहे; कारण आमच्या काही निकटच्या लोकांनी जेव्हा मसूदशी संपर्क साधला, तेव्हा त्याने जैशचा हात असल्याचे खंडन केले आणि हाच आमचा नेमका संभ्रम आहे, असेही ते म्हणाले. जैशच्या म्होरक्याशी तुमच्यापैकी नेमका कुणी संपर्क साधला, असे विचारले असता, मसूदला ओळखणारे काही लोक त्याच्याकडे गेले होते, असे त्यांनी सांगितले.
 
तथापि, आम्हाला जर भारताच्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळून आले, तर आम्ही जैशविरुद्ध नक्कीच कारवाई करणार आहोत. आमच्या भूमीचा गैरवापर होत असल्याने पाकिस्तान बदनाम होत आहे आणि आम्ही ही बाब कदापि मान्य करणार नाही. आमच्या पाक भूमीला आम्ही नापाक होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. भारतासोबत आम्हाला चांगले संबंध हवे आहेत, युद्ध हा कोणत्याही समस्येवर पर्याय असूच शकत नाही. त्यामुळे दहशतवादासह सर्वच मुद्यांवर भारतासोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.