पाक लष्कर आणि आयएसआयचे 'विषारी' षडयंत्र; काश्मीरमध्ये अलर्ट जारी
   दिनांक :02-Mar-2019
नवी दिल्ली:
 जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यातच आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी 'द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स' (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनचे मोठे षड्यंत्र समोर आले आहे.

 
 
 पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याची षड्यंत्र आखत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची योजना पाकिस्तानी  लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात आल्याचे समजते.
 
भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी आयएसआय आपल्या काश्मीरमधील एजेंटचा वापर करु शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. त्यामुळे दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.