एयर स्ट्राईकमध्ये जैशच्या चार इमारती उद्ध्वस्त; सार (SAR )च्या सहाय्याने घेण्यात आला फोटो
   दिनांक :02-Mar-2019
भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचे नुकसान झाले  आहे. सध्या टेक्निकल आणि ग्राऊंड इंटेलिजन्सची मर्यादा असल्यामुळे नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याची नेमकी माहिती देणे शक्य नाही. 

 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडे सिथेंटिक अपर्चर रडारच्या (सार) सहाय्याने घेण्यात आलेले फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज २००० ने पाच S-२००० प्रिसिजन गायडेड म्युनिशन (पीजीएम ) च्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानने भारताने हल्ला केल्याचे मान्य केल आहे. मात्र तिथे दहशतवाद्यांचे तळ होते किंवा काही नुकसान झाले आहे हे मान्य करण्यास नकार दिला आहे. 
‘आमच्याकडे SAR च्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंच्या स्वरुपात पुरावा आहे की एक इमारत गेस्ट हाऊसप्रमाणे वापरली जात होती. तिथे मौलाना मसूद अझहरचा भाऊ राहत होता. एक एल आकाराची इमारत होती जिथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहत होते. दोन मजल्याच्या एका इमारतीतही प्रशिक्षण घेणारे राहत होते. तसेच एका इमारतीत कॉम्बॅट ट्रेनिंगच्या शेवटच्या टप्प्यात असणारे राहत होते. या सर्व इमारतींनी बॉम्बने टार्गेट करत उद्ध्वस्त करण्यात आले’.
अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले आहे की, हे फोटो सार्वजनिक करायचे की नाही हा निर्णय राजकीय नेतृत्वाला घ्यायचा आहे. सार ने घेतलेले फोटो सॅटेलाइट फोटोंइतके स्पष्ट नाही. मंगळवारी ढग दाटले असल्या कारणाने आम्ही सॅटेलाइटच्या सहाय्याने चांगले फोटो घेऊ शकलो नाही. अन्यथा प्रश्नच मिटला असता’.
 
हल्ला झालेली जागा सध्या पाकिस्तानी लष्कराने सील केली आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळवणे गुप्तचर यंत्रणांसाठी कठीण होती आहे. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा सध्या काल्पनिक आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.