समझोता एक्स्प्रेसची सेवा उद्यापासून सुरु
   दिनांक :02-Mar-2019
पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा उद्यापासून सुरु होणार आहे. दोन्ही देशांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस निघणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
 
 
 
 
पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला आहे. तीन मार्चला भारतातून पाकिस्तानसाठी पहिली ट्रेन निघेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारताने पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस बंद केली होती. भारतातून रविवारी समझोता एक्सप्रेस पाकिस्तानला जाईल. त्यानंतर सोमवारी लाहोरहून हीच ट्रेन परतीच्या प्रवासाला निघेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच प्रयत्न सुरु आहेत. समझोता एक्सप्रेसची सेवा पूर्ववत होणे याला तणाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणता येईल.