अमेरिकेने पाकिस्तानकडून मागितले उत्तर
   दिनांक :02-Mar-2019
 भारताने बालकोटमधील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून एफ-१६ फायटर जेटस विमानांचा वापर केला. पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर करुन अमेरिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी अमेरिकेने पाकिस्तानकडून उत्तर मागितले आहे.

 
 
 भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले. पण पाकिस्तान हे मान्य करायला तयार नव्हता. अखेर गुरुवारी भारताने पाडलेल्या एफ-१६ विमानाचे अवशेष पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामध्ये एफ-१६ मध्ये असलेल्या अ‍ॅमराम क्षेपणास्त्राचे भाग होते.
एफ-१६ चे अवशेष दाखवल्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर आला. पाकिस्तानने एफ-१६ चा वापर केल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्ही त्यांच्याकडे यासंबंधी आणखी माहिती मागितली आहे असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. गोपनीयतेच्या अटींमुळे याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही असे अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.