अभिनंदनचे स्वागत!
   दिनांक :02-Mar-2019
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यातून शुक्रवारी भारतात सकुशल परत आला. त्याचे मन:पूर्वक स्वागत आहे. तो पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यापासून देशभक्त भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती आता थांबली असून ते हृदय आनंदाने, अभिमानाने उचंबळून आले आहे. शस्त्रापेक्षा ते चालविणारी व्यक्ती महत्त्वाची असते, हे सनातन सत्य पुन्हा एकदा अभिनंदन याने सिद्ध करून दाखविले आहे. शूर, निर्भीड, साहसी, निष्णात... किती विशेषणे लावावीत? असा हा अभिनंदन, खरेच अभिनंदनास पात्र आहे. भारताच्या लष्करात हा असा एकटाच नाही. अनेक आहेत. लाखो आहेत. कॉंग्रेस सरकारच्या नाकर्तेपणामुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात अजूनही वापरात असलेल्या जुन्या मिग-२१ विमानाला अत्यंत धाडसी कौशल्याने चालवून अभिनंदनने पाकिस्तानच्या आधुनिक एफ-१६ विमानांना पिटाळून लावले.
 
अशा या अभिनंदनला तीन दिवसांतच पाकिस्तानने कसे काय सोडले, यावर सध्या घनघोर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सहृदयतेने अभिनंदनला सोडण्याचे ठरविले. पाकिस्तान युद्धापेक्षा शांतीला किती महत्त्व देतो, हे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. इम्रान खान खरे मुत्सद्दी व परिपक्व नेते आहेत, या किंवा अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाकिस्तानातून नाहीत, तर भारतातील काही कथित बुद्धिवंत, प्रस्थापित पत्रकारांकडून येत आहेत. अभिनंदनच्या सुटकेच्या आनंदाला लागलेली ही काळी किनार आहे. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. या अशा धेंडांना काय म्हणावे, यासाठी शब्दही सुचत नाहीत. राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, निखिल वागळे, सबा नक्वी, तसेच एनडीटीव्हीचे पत्रकार तसेच राजकीय नेत्यांपैकी नवज्योतसिंग सिद्धू, केजरीवाल, प्रियांका चतुर्वेदी, संजय झा, रणदीप सुर्जेवाला, ममता बॅनर्जी आदी मंडळी अजूनही भारताची जागतिक स्तरावर वाढलेली शक्ती मानायला तयारच नाहीत. या सर्वांचा मोदीद्वेष जगजाहीर आहे. परंतु, मोदींचा द्वेष करता करता ही मंडळी भारताचा द्वेष करू लागली आहेत.
 
 
 
अभिनंदन याची तीन दिवसांतच सुटका झाली, त्यासाठी भारत सरकारचे कुठलेच प्रयत्न कारणीभूत नव्हते का? भारतातील सत्तारूढ नेतेमंडळी फक्त आपल्या पक्षाच्या राजकीय प्रचारातच मग्न होती का? वर उल्लेखिलेल्या लोकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानने अभिनंदनला सोडण्याचा निर्णय घेतला का? या मंडळींची वक्तव्ये पाहिली तर असेच मानावे लागेल. अरविंद केजरीवालने तर शुक्रवारी विधानसभेत आपल्या द्वेषबुद्धीचा कहरच केला. तो म्हणाला, ३०० जागा निवडून येण्यासाठी आम्ही (म्हणजे भाजपा) किती जवानांना शहीद करणार आहोत? हे सर्व प्रकार बघितले तर मन सुन्न होते. इतक्या नीच पातळीवर हे लोक कसे काय उतरू शकतात, याचे सखेदाश्चर्य वाटू लागते. कधी काळी आम्ही याच लोकांना डोक्यावर घेतले होते, याची लाज वाटू लागते.
 
या लोकांचे म्हणणे खरे मानले, तर निवडणुकीत ३०० जागा मिळण्याची खात्री करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पुलवामा येथील हल्ला घडवून आणला, असेच मानावे लागेल. कसे शक्य आहे हे? मागेही गोध्रा येथे ५९ निष्पाप कारसेवकांना साबरमती एक्सप्रेसच्या डब्यात जाळून मारण्यामागे, निवडणुकीचेच गणित होते, असा आरोप झाला होता. आजही होतो. तशाच प्रकारचा आरोप पुलवामा हल्ल्याबाबत होत आहे. ज्याची पाळेमुळे निखंदून काढण्यासाठी मोदी सरकार आकाश-पाताळ एक करत आहे, त्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, मोदी जिंकावे म्हणून प्रयत्नशील आहे, असे समजायचे का? पुलवामा हल्ला झाल्यावर ‘कुठे गेली ५६ इंचाची छाती’ म्हणून लगेच मोदींना हिणवणे सुरू झाले. मोदींनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले, तर आता मोदी युद्धपिपासू झाले आहेत, म्हणून विषवमन करण्यात आले. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या अभिनंदनला तीन दिवसांच्या आतच पाकिस्तानने सोडले, तर याला इम्रान खानचा दिलदारपणा म्हणून संबोधणे सुरू झाले आहे. आमच्या तर्काला, कारणमीमांसेला काहीतर संगती हवी ना! की मोदीद्वेषापायी आम्ही आमची विचारशक्तीही गमावून बसलो आहोत?
 
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला होता. शेकडो निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले होते. तेव्हाच्या वायुसेना अधिकार्‍यांनी सर्जिकल स्ट्राईकची परवानगी मनमोहन सरकारला मागितली होती. एक महिना वाट पाहून शेवटी वायुसेनेने आपली तयारी रद्द केली. मनमोहन सरकारने का नाही दिली त्यांना परवानगी? असे निर्णय घ्यायला हिंमत  लागते. ती उसनी येत नाही. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनीही अण्वस्त्र चाचणीची पूर्ण तयारी केली होती, परंतु ऐनवेळी ती चाचणी रद्द केली. का? नंतर आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंमत दाखवून, अमेरिकेच्या दादागिरीला वाकुल्या दाखवत अण्वस्त्र चाचणी करून दाखविली. कॉंग्रेसचे पंतप्रधान असे कच का खातात? आपल्या भारतातले लष्करी अधिकारी असोत वा शास्त्रज्ञ, ते कधीच कमी नव्हते. परंतु, त्यांना ‘पुढे जा’ असे हिमतीने म्हणणारे राजकीय नेतृत्वच कचखाऊ निघत असतील तर ते तरी काय करणार? हे सर्व सांगण्याचा उद्देश हा की, भारताच्या यशस्वी हवाई कारवाईनंतर विरोधकांनी भारतीय वायुदलाचे, वैमानिकांचे तोंड भरून कौतुक केले. परंतु, त्यांना खुली सूट देणार्‍या हिंमतबाज मोदींबद्दल एकही शब्द काढला नाही. खरे श्रेय मोदी आणि मोदींचेच आहे, हे निश्चित!
 
अभिनंदनच्या सुटकेबाबतही हेच घडले. गेल्या चार वर्षांतील नरेंद्र मोदींच्या परदेश वार्‍या आठवा. त्यावर खालच्या पातळीवरून किती टीका झाली होती! परंतु, या दौर्‍यांतून नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला जागतिक पातळीवर केवळ एकटेच पाडले नाही, तर पाकिस्तानचे राखणदार देशही आपल्या बाजूला वळविले. आज भारताला जागतिक स्तरावर जो मान-सन्मान आहे, भारताच्या शब्दाला जी किंमत आहे, ती केवळ आणि केवळ मोदींच्या अफलातून मुत्सद्देगिरीमुळेच आहे, यात काही शंका नाही. त्याचेच फळ म्हणून, अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानवर जगातील देशांचा प्रचंड दबाव आला. हा दबाव झुगारणे, भिकारड्या पाकिस्तानला शक्य नव्हते आणि म्हणून मोठ्या नाखुषीने त्याने अभिनंदनला त्वरित सोडण्याचा निर्णय घेतला. असे असताना, नरेंद्र मोदींच्या स्तुतीचा एकही शब्द या लोकांच्या मुखातून निघत नाही!
 
एवढी सर्व धुमश्चक्री सुरू असताना, नरेंद्र मोदी त्यांच्या नित्य कार्यक्रमात व्यग्र होते. यावरही टीका सुरू आहे. सागरिका घोष म्हणते की, अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतरही मोदींच्या तोंडून त्याच्याबाबत एक शब्दही निघाला नाही. आता या बाईला काय म्हणावे? नरेंद्र मोदींनी न बोलता अभिनंदनच्या सुटकेची पूर्ण व्यवस्था केली. त्याचे काहीच नाही का? थोडक्यात काय की, पुलवामाचा हल्ला मोदींनी घडवून आणला. बालाकोटवर यशस्वी हवाई कारवाई वायुसेनेमुळे झाली आणि अभिनंदनची सुटका उदार मनाच्या इम्रान खानमुळेच शक्य झाली. हेच प्रतिपादन आता आगामी काळात अनेकानेक लेखांमधून, चर्चांमधून भारतीय जनतेसमोर मांडण्यात येणार. या अस्तनीतल्या सापांना ठेचण्यासाठी आता भारतीय जनतेलाच निश्चयाने पुढे यावे लागणार आहे आणि त्यासाठी घोडामैदान जवळच आहे. गंमत म्हणजे, हे सर्व विष पचवून, शांत डोक्याने हा माणूस पुढेच चालला आहे. असे वाटते की, या देशाच्या उद्धारासाठी मॉं जगदंबेने निवडलेली व्यक्ती हीच तर नसेल ना...!