अभिनंदन यांचे सुरक्षा कवच ठरलेला जेनेवा करार काय आहे ?
   दिनांक :02-Mar-2019
भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना प्रत्युत्तर देतांना आपले एक मिग-२१ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि पाकिस्तानी सैन्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले. या नंतर काही तासातच अभिनंदन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये ते सुखरूप असल्याचे सांगत चहा पितांना दिसले. आपल्या पैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, अतिरेक्यांना पोसणारा पाकिस्तान अचानक इतका दयाळू कसा काय झाला ? अभिनंदन यांना पाकिस्ताने दिलेली वागणूक हा पाकिस्तानच्या कुठल्याही दयाळू-मायाळूपणाचा भाग नसून तो एका विशिष्ट कराराचा भाग आहे. या कराराचे नाव आहे 'जेनेवा करार' (Geneva Convention). अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानात सुरक्षा कवच ठरलेला जेनेवा करार नेमका आहे तरी काय ? हे थोडक्यात जाणून घेऊया.
 


 
युद्धजन्य परिस्थितीत एखादा सैनिक अथवा सैन्याची तुकडी जर दुसऱ्या देशाच्या हद्दीत पकडल्या गेली तर त्या सैनिकांवर हा करार लागू होतो. या करारा अंतर्गत युद्ध बंदी केलेल्या सैन्याला अमानवीय वागणूक देण्याचा हक्क नाही. दुसऱ्या देशात युद्ध बंदी असलेल्या सैनिकाला अपमानजनक वागणूक दिल्यास, वैद्यकीय सुविधेपासून वंचित ठेवल्यास, जीवनावश्यक सुविधा न पुरविल्यास आणि त्याची स्वदेशी पाठवणी न केल्यास जेनेवा करार भंग केल्या प्रकरणी  त्या देशावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवला जावू शकतो. युद्धजन्य परिस्थितीत मानवीय मूल्याचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हा करार करण्यात येतो. या करारात एकूण चार चरण आहेत. पहिला जेनेवा करार हा १८६४ मध्ये करण्यात आला होता त्यानंतर दुसरा १९०६, तिसरा १९२९ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ मध्ये १९४ देशांनी एकत्र येत या कराराला लागू केले आहे. याच जेनेवा कराराअंतर्गत पाकिस्तानला विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुरक्षित मायदेशी परत पाठवणे बंधनकारक होते.