...झाडी पहिल्यांदाच निघाली मुंबईला
   दिनांक :02-Mar-2019
चंद्रपूर:
विदर्भाची नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या श्री व्यंकटेश नाट्य मंडळाचे तीन व्यावसायिक नाट्य प्रयोग आता पुण्या-मुंबईत पहिल्यांदाच सादर होत आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवर सुपरहिट ठरलेलं सदानंद बोरकर यांचं 'अस्सा नवरा नको ग् बाई!' हे नाटक यावर्षी नागपूर येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर झालं. कविवर्य सुरेश भट सभागृहात मध्यरात्री 2 वाजता नाटक होऊनही ते हाऊसफुल होतं. पुण्या मुंबईच्या दिगग्ज कलावंतांनी पहाटे पाच पर्यंत आस्वाद घेतला. प्रेक्षकांनी अक्षरशः नाटक डोक्यावर घेतलं. सर्वदूर चर्चा गेली आणि आयोजकांनी त्याचे प्रयोग पुण्या मुंबईच्या प्रेक्षकांसाठी लावले.
 

 
 
6 मार्च ला दुपारी 4 वाजता साहित्य संघ गिरगाव येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या 31 व्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत गंगाजमुना या नाटकाचा प्रयोग सादर होणार असून 7 मार्च ला दुपारी 4 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अस्सा नवरा नको गं बाई हे नाटक सादर होणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च ला रात्री 9 वाजता पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात अस्सा नवरा नको गं बाई ह्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे. दोन्ही नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सदानंद बोरकर असून विजय मुळे, मंजुषा जोशी, अंगराज बोरकर, विश्वनाथ पर्वते, कमलाकर कामडी, देवयानी जोशी, चंद्रसेन लेंझे, शिल्पा माडले आणि सदानंद बोरकर यांच्या ह्या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका आहेत. यानिमित्त पुणे मुंबईकरांना झाडीपट्टीचा अस्सल बाज बघायला मिळणार आहे.