चीनच्या बेल्ट ॲण्ड रोड फोरमवर भारताचा पुन्हा बहिष्कार!
   दिनांक :20-Mar-2019
-भारताने दिले संकेत
 बिजिंग;
 चीनच्या दुसर्‍या बेल्ट ॲण्ड रोड फोरमवर (बीआरएफ) परत बहिष्कार टाकण्याचे संकेत भारताने दिले आहेत. क्षेत्रीय ऐक्य आणि सार्वभौमत्व या महत्त्वपूर्ण मुद्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या देशाच्या कार्यक्रमात भाग घेणे शक्य नाही, असे भारताने सांगितले.
चीनचा वादग्रस्त चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) गुलाम काश्मिरातून जात असून, या मुद्यावर भारताने व्यक्त केलेल्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याने याचा निषेध करीत भारताने २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या बेल्ट ॲण्ड रोड फोरमवर बहिष्कार टाकला होता.
 
 
 
पुढच्या महिन्यात मोठ्या बीआरआफचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सहभागी होणार असल्याचे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी नुकतेच सांगितले होते. चीनचा झिनजियांग प्रांत रस्ते, रेल्वे, गॅस आणि तेलाच्या पाईपलाईनसह पाकिस्तानातील ग्वादर प्रांताला जोडण्याच्या हेतूने उभारल्या जात असलेल्या सीपीईसी प्रकल्पात ६००० कोटी डॉलर्सची गुंतवणूक वाढवण्याची घोषणा चीनने केली आहे. त्यानंतर यामध्ये भारत सहभागी होईल अथवा नाही, याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर अंदाज व्यक्त केला जात आहे. सीपीईसीअंतर्गत चीनने पाकिस्तानात ऊर्जा प्रकल्प उभारण्याचाही निर्णय घेतला आहे.
 
संयोजकतेसाठी सर्वप्रथम सार्वभौमत्व, समता आणि देशाच्या क्षेत्रीय ऐक्याचा आदर करणे आवश्यक आहे, असे भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी सांगितल्याचे वृत्त चीन सरकारच्या ग्लोबल टाईम्सने दिले आहे.सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सचोटीवरील मूलभूत चिंताकडे दुर्लक्ष करणार्‍या कोणत्याही पुढाकारात कोणताही देश सहभागी होऊ शकत नाही, असे त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितल्याचे वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे.