रंगांनी ढळण्याआधी रंगवेड्यांनी चिंब व्हावे...
   दिनांक :20-Mar-2019
 यथार्थ 
 
श्याम पेठकर  
 
आयुष्यात काही क्षण सावळ्याच्या बासरीतून यमुना पाझरावी तसे तरळत येतात. मनाचा रिता डोह मग भरभरून ओसंडतो. आयुष्याचं गोकुळ होतं. स्वप्नांच्या किनार्‍यावर राधा नाचू लागते आणि रंगांचं कारंजं स्वयंतेजाने थुयथुयत राहतं. वसंत आला की, अशी रंगधून निनादू लागते. या रंगाला स्वरगंधाची गोड खळी पडलेली असते. या अशा वातावरणात कायम शहाणे असणार्‍यांनाही वेड लागावं किंवा मग शहाणे असणे हे वैगुण्य ठरावे. जीवनाला जगण्याचं खूळ लावणारे हे दिवस असतात. मरणालाही श्वासांची पालवी फुटावी, असेच चिरंजीव दिवस असतात हे. छातीवर दगडही ठेवून पाहिला तरीह कोवळी- हिरवी पालवी कुठून फुलते तेच कळत नाही. दिवसाच्या धगीनं रात्रही पेटत राहते. मग गात्रांची काय कथा? रात्र फुलत जाते आणि रात्रीची फुलं होतात. फुलं म्हणजे रंग आणि गंधाचे कोवळे दूतच. या दिवसात मग फुलांच्याच चर्चा असतात. त्यांच्या भाषेला मात्र रंगांचे धुमारे फुटलेले असतात. फुलांच्याच भेटी होतात, भेटीचीही फुलं होतात. भेटीची झालेली ही फुलं मग अनंतापर्यंत सोबत करतात. फुलांचं एक बरं असतं. फुलं कोमेजली तरी त्यांच्या सुगंधाचा अर्क करून ठेवता येतो. अत्तरानं माणूस धुंद होतो, पण बेधुंद होत नाही. अत्तरानं अस्तित्व मोहित होईल, पण अत्तराची नशा नाही चढत. अत्तर हृदयाचा ताबा घेतं, मेंदूला गुलाम नाही बनवीत. निर्व्याज, निष्पाप फुलांची दारू कशी होणार? सुगंध देऊन विलीन होणारं अत्तर होणं हे फुलांचं प्राक्तन असतं. म्हणून फुलं कोमेजली की, त्यांचं निर्माल्य होतं, कचरा नाही. कोमेजलेल्या फुलांच्या रंगांचं काय होत असावं, असा प्रश्न पडावा अन्‌ तो अनुत्तरित राहूनही एक वेगळाच आनंद या प्रश्नानेच द्यावा, असेच हे वातावरण असते.
 

 
 
 
फुलांचा गंध श्वासात गोठवून घेतला अन्‌ डोळे मिटले की, मनात रंगवेलींची नक्षी उभी राहते. पण, गंधवेडानं श्वासांची कोरीव शिल्पं होण्यासाठी सजीवांनी रंगांशी प्रामाणिक असण्याची गरज असते. समर्पणाचा ॐकार जागविल्याशिवाय रंगांशी जवळीक साधताच येत नाही. मुळात रंगून जायचे असेल, तर मनाची पाटी कोरी हवी. रंगता कशातही येतं; पण त्या आधी अस्तित्व फुलांवर पडलेल्या दविंबदूंसारखे निर्मळ व्हायला हवे. त्यासाठी सामान्यांनी पूजा करावी. पूजेनं मन निरभ्र होतं. निरभ्रता नेहमीच विशाल असते. अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेली असते. सकल जिवांचा दरवळ असा अनंतापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा करायला हवी. पूजेतही रंगून जाता येतं अन्‌ पूजा कशाचीही करता येते. प्रतीकांचीही आणि परमेश्वराचीही! ज्याला फुलं, त्यांच्या रंग-गंधासह कळली, त्याला पूजा कळते. पूजा फुलांचीही करता येते. फुलांच्या पूजेची मग कविता होते. कविता मग तिच्या असंख्य रंगांसह अस्तित्वाचा तळ गाठते. आपल्या अस्तित्वाचीही पूजा करता येते. अस्तित्वाची पूजा हा प्रतीकातून परमेश्वराकडे जाण्याचा मधला टप्पा आहे. या प्रवासात अस्तित्वाच्या तळाशी अधिष्ठित झालेल्या कवितेची भेट होते. ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर केवळ कविताच देऊ शकते. पूजा कवितेचीही करता येते. मग शब्दांची फुले होतात. कवितेलाही रंग चढतो. रंग मग शब्दांनाही सोडत नाही. अस्तित्वकातर झालेल्या जिवांना हे रंगच शांत करतात. पूजा रंगांचीही करता येते. मात्र, ही पूजा म्हणजे कडवे कर्मकांड नको. नाहीतर मग रंग विस्कटतात. रंगांनाही वर्गवारीचे, पृथक्‌ होण्याचे विकार जडतात. अशा रंगांचा मग दाह होतो. मात्र रंगांच्या पूजेत श्रीरंग जागला की ही पूजा साधली असे समजायचे असते. ती तशी साधली की पानांचीही फुले होतात. वसंताला ही पूजा साधली आहे म्हणूनच मग वसंतात पानेही विविध रंगांत रंगून जातात. वसंतपूजाही होते. झंकारलेल्या हृदयाची माणसं वसंताची पूजा करू शकतात. मनात एकदा प्रेमाचा मोगरा फुलला की, वसंतपूजा नकळत सुरू होते. माणूस हळवा झाला की, उंबरे अडवितात त्याला; पण उंबरठा ओलांडल्याशिवाय माणूसपणही गवसत नाही. झंकारलेल्या आयुष्याचे अर्थही गहाण असतात, हे खरे असले तरीही वसंताची मनोभावे पूजा केली, तर जिथे वाट निसरडी होते, तेथून मागे फिरण्याचं कौशल्य आपोआपच अंगी येतं. पण, त्यासाठी माणूसपण जागवावं लागतं. फुलांचं हळवेपण कळावं लागतं. रंगांधळ्यांना माणूस होता येत नाही. असे रंगांधळे मग रंग वाटून घेतात. रंगांवर अधिकार सांगतात.
 
रंग कधीच कुणाचे गुलाम नसतात. स्वत:चेही! रंगांचा असा वेगळा धर्म नसतो अन्‌ धर्माचे कुठलेच रंग नसतात. तरीही माणसं धर्म रक्तात भिजवून लालजर्द करतात. समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे रंग. एकमेकात मिसळताना स्वत:चे संपूर्ण अस्तित्वच विरवून टाकण्याचं कसब रंगांतच असतं. नव्हे, तो त्यांचा निसर्गस्वभाव असतो. तरीही रंग एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारत नाहीत. सहजीवनाची दीक्षा रंगांकडूनच घ्यावी. आपल्या अस्तित्वाच्या सार्‍याच कक्षा रंगांत न्हाऊन निघाल्या आहेत. शब्दरंग, काव्यरंग, भक्तिरंग, मनोरंग, प्रेमरंग... रंगांच्या या प्रवासात श्रीरंगाची भेट कधीही होऊ शकते, पण त्यासाठी रंगांशी रंगांइतकंच समर्पित असावं लागतं. प्रेमाच्या सप्तरंगात विलीन व्हावं लागतं. आपण द्वेषासाठी पायघड्या अंथरताना प्रेमाला मात्र नकार देतो. जीवनाचे जड ओझे निमूटपणे वाहताना बकुळफुलांच्या भारालाच भितो. बकुळ फुलांच्या गंधाचा आपला एक रंग असतो स्वत:चा. झोपाळ्यातून तो तिच्या देहात नांदू लागतो, ते तिलाही कळत नाही.
 
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं. लैलाच्या मजनूला स्मरावं, शिरीनच्या फरहादला स्मरावं, कृष्णवेड्या राधेला स्मरावं... मग जीवनाला ‘गिरिधर गोपाल’ म्हणत विषही प्राशन करता येतं. पचविता येतं. प्रेम अंकुरलं हृदयात की, हे फार सोपं होतं. रात्रीला चांदण्याची फुलं होतात. स्निग्ध रंगात वेल्हाळ झालेल्या रात्री तिच्या गात्रांची फुलं होतात. फुलांकडे वेळ थोडा असतो. मग ते खळखळून हसून घेतात, प्रत्येक क्षण जगून घेतात. अनासक्त अनावर झालेली ती मग हळूच त्याचा हात ओढून घेते आणि डोळ्यांतील काजळाने त्याच्या हातावर लिहिते- ‘प्रेम!’ प्रवास असाच सुरू होतो. असे झंकारलेले जीव काहीही करायला तयार असतात. अशी प्रत्येक रात्र उजळलेल्या सकाळकडे जात असते. पहाटेच्या भूलभुलैयात सूर्यही हरवतो. जर्द गुलाबी रात्रीच्या आठवणीने मत्त केशरी होतो. क्षितिजाच्या पलीकडे रात्रीची काजळकडा तशीच असते. ती दोघं त्या काजळकडेवर विसावलेली असतात. त्यांच्या दिवसाचीही रात्र झालेली अन्‌ या दिवसाला स्वप्नांच्या लाघवी वेलींनी वेढा घातलेला. मग उजेडाच्या गालावर अंधाराचा तीट लावत रात्र येते. कुणाची तरी हळदभरली हळवी पावलं हळूच घरात येतात. हळदगोर्‍या हातांनी गात्रा-गात्रावर समर्पणाची मेंदी लावून निघून जातात. मेेंदी रंगत राहते. मेंदी अशी रंगली की, हात लाजून आरक्त होतात. असे बावरे हात देहभर फिरले की, कळ्यांची फुलं होतात. ही फुलं जपून ठेवावी. कारण, जाताना ते हात नेमकी कळ्यांची झालेली फुलं मागतात. फुलांची एक जमात उभी राहते. येणार्‍या रात्रीला तो त्याच फुलांचे गजरे आणतो... पण, गजर्‍यांची अशी लाजरी भेट प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच असे नाही. नव्हे, येतच नाही, हेच खरे. कारण, प्रेमाला आपला कडवा विरोध असतो. प्रेमाच्या नकाराने विदग्ध झालेले जीव मग करपून जातात. फुलं त्यांना नकोशी वाटू लागतात. रंगांचा ते छळ करतात. स्वप्नांसह पापण्याही खुडून नेतात. पाकळ्या नखांनी कुरतडून टाकतात. अशांना मग फुलं घाबरतात आणि रंग टाळायला लागतात. असे झाले की, मग जग समजतं ‘आपल्यात आला.’ पण एक नक्की. रंगधून जाणली की, प्रेमाच्या कबरीचाही ताजमहाल होतो. वसंताची जादू ओसरून वेड्या रंगांनी पळ काढण्याआधीच रंगवेड्यांनी त्यात चिंब झालं पाहिजे...