सण साजरा करू, ‘सेलिब्रेट’ नव्हे!
   दिनांक :20-Mar-2019
 
आज होळी साजरी केली जाईल. उद्या, गुरुवारी धुळवड. हे दोन्ही सण भारतीय संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. भारतीय संस्कृतीत या दोन्ही सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पूर्वापार हे सण आपण साजरे करत आलो आहोत. त्यामुळे ते यंदाही आनंदाने आणि उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत. पण, हे सण साजरे करताना एक काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. होळी पेटवताना लाकडांचा वापर टाळता आला तर बघावा. पर्यावरणरक्षणासाठी झाडांची, जंगलांची फार आवश्यकता असते. दुर्दैवाने आपल्याकडे गतकाळात मोठ्या प्रमाणात जंगलकटाई झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभगाच्या 33 टक्के जंगल असावयास हवे. याचा अर्थ असा की, 33 टक्के भूभागावर झाडं असायला हवीत. पण, दुर्दैवाने आपल्या देशात हे प्रमाण 19 ते 21 टक्के एवढेच आहे. त्यातही विषमता आहे. काही भागात जंगलं जास्त आहेत, तर काही भागात अजीबातच नाहीत.
 

 
 
 
महाराष्ट्राचेच उदाहरण घेता येईल. विदर्भात 45 ते 47 टक्के जंगल आहे. पण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे जंगलाचे प्रमाण अत्यल्प आहे. कोकणात जंगल बर्‍यापैकी आहे. पण, सगळीकडे जर समतोल राहिला, तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते आणि त्यामुळे होणारे नुकसानही टाळता येऊ शकते. जी गोष्ट झाडांची, तीच पाण्याचीही आहे. उद्या धुळवड साजरी केली जाईल. धुळवड साजरी करतानाही काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. शिवाय, रंग उधळताना आनंदावर विरजण पडणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल. अनेकदा रंगांमध्ये जी रसायनं असतात, ती घातक स्वरूपाची असतात. त्यामुळे त्वचा खराब होण्याचा धोका संभवतो. शिवाय, डोळ्यांत रंग गेल्यास डोळ्यांनाही इजा पोहोचू शकते. त्यामुळे धुळवड साजरी करताना पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे आणि कृत्रिम
 
रंगांचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे ठरणार आहे. पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यावर आपला भर असला पाहिजे.
त्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृतीही केली जात आहे. त्याला प्रतिसाद देणे हीसुद्धा काळाची गरज आहे.
पर्यावरणाला हानी न पोचवता सण साजरे करणे ही आता गरज झाली आहे. जंगलांचे प्रमाण घटल्यामुळे उष्णतामान वाढत चालले आहे. ऋतुमान बदलले आहे. पावसाळ्यात पाऊस वेळवर पडत नाही, पडलाच तर एकाच दिवशी बदबद कोसळतो आणि हाहाकार माजवतो. पावसाचा लहरीपणा वाढल्यामुळे कृषिप्रधान असलेला आपला देशही संकटात सापडला आहे. शेतकरी बांधव शेती सोडून रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतो आहे. त्यामुळे नागरीकरण वाढले आहे. वाढत्या नागरीकरणाचेही अनेक धोके आहेत आणि त्यांचा मुकाबला आम्ही आताच करीत आहोत. वाढत्या शहरीकरणामुळे शहरांवरील ताण वाढला आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करताना प्रशासनाची आणि सरकारी यंत्रणांची दमछाक होत आहे. शेती पिकली पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे, देश सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला पाहिजे असे वाटत असेल, तर ‘गावांकडे चला,’ असा नारा दिला पाहिजे. जे गावात राहात आहेत, त्यांना तिथेच उत्तम सोईसुविधा पुरविल्या तर ते लोक गावे सोडणार नाहीत आणि चांगला पाऊस पडून शेती पिकावी असे वाटत असेल, तर चांगल्या पावसासाठी आवश्यक जंगलं आपण वाढवली पाहिजेत. जून-जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये पाऊस फारच कमी पडल्याने राज्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळाचे सावट आहे. विशेषत: विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा-गोंदिया; मराठवाड्यातील जालना, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद ग्रामीण, नगर; तिकडे सोलापूर, सांगलीचा काही भाग अशा अनेक भागात पाणीसमस्या बिकट होणार आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करून सकारात्मक पावलं टाकली पाहिजेत. पावसाळ्यात पाऊस पडत नाही, हिवाळ्यात थंडी पडत नाही, पडली तर प्रमाणाबाहेर असते, उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता थोडी जास्तच असते. उन्हाचे चटके असह्य होतात. हे सगळे जे घडते आहे, त्याला आपण सगळे कारणीभूत आहोत. आपणच जंगलांची बेसुमार कटाई केली, विकासाच्या नावावर अक्षरश: निसर्गाची वाट लावण्याचे पाप आपण केले आहे.
 
निसर्गाचीही सहनशक्ती असते, याचा आपल्याला विसर पडला आहे. किती दोहन करायचे, याला काही मर्यादा आहेत. आपण आपल्या गरजा कमी करायलाच तयार नाही. एक घर झाले असताना आपल्याला दुसरे घर हवे, तिसरे हवे, एक कार असताना आपल्याला दुसरी हवी. यात आपण निसर्गाचा समतोल बिघडवतोय्‌, याचे भानच ठेवत नाही. भौतिकवादाकडे आपला कल वाढला आहे. ऐहिक सुखाची कल्पना त्यागून आपण भौतिक सुखाकडे धाव घेतो आहोत. पण, भौतिक सुखाला मर्यादा घालायला तयार नाही. ऐहिक सुखाला कुठल्याही प्रकारच्या मर्यादेची गरज नाही, त्यासाठी झाडंही तोडावे लागत नाहीत आणि पाण्याची नासाडीही करावी लागत नाही. शिवाय, ऐहिक आणि पारमार्थिक सुखासाठी कुठलाही पैसा लागत नाही. भौतिक सुखाच्या तुलनेत ऐहिक सुखाचा जो आनंद आहे, तो शतपटीने जास्त असतो, हे ओळखण्यात आपण कमी पडतो आहोत. वाईट गोष्टींचा त्याग आणि चांगल्यांचा स्वीकार करण्याचा संदेश होलिकोत्सवातून दिला जातो. आपणही जंगलतोड, पाण्याचा अपव्यय यासारख्या वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा संकल्प आज करायला हवा. पाणी हेच जीवन आहे, असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे अनमोल अशा उपलब्ध पाण्याची नासाडी करायची, अशी दुटप्पी वागणूक ठेवून आम्ही स्वत:चेच नुकसान करून घेतो आहोत.
निसर्ग हा मानवी जीवन सुखकर करणारा आहे, हे समजून घेऊन आपल्या पूर्वजांनी मोठ्या कल्पकतेने सण-उत्सव, व्रतवैकल्ये यांची आखणी केल्याचे दिसून येते. या सणांच्या निमित्ताने निसर्ग आणि निसर्गातील विविध घटक म्हणजेच पाणी, फुले, पाने, पशू, पक्षी, नदी, समुद्र यांचे पूजन करायची प्रथा दिसून येते. आपले जीवन सुखकर करणार्‍या प्रत्येक घटकाचे सण-उत्सवाच्या निमित्ताने स्मरण करायचे, पूजन करायचे आणि कृतज्ञता व्यक्त करायची, अशी शिकवण अपली संस्कृती देते. सण-उत्सवांच्या निमित्ताने आनंदात आप्तस्वकीयांबरोबर काही काळ घालवताना इतरांना उपद्रव होणार नाही, कुणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी आपोआपच घेतली जायची.
 
बदलत्या काळाबरोबर आयुष्य जगण्याचे, यातील आनंद लुटण्याचे संदर्भही बदलत गेले. सण आनंदाने साजरे करण्यापेक्षा ‘सेलिब्रेट’ करण्याकडे कल वाढत गेला. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरा होणारा होळी पौर्णिमेचा सणही याला अपवाद नाही. खरेतर पूर्वी अंगणात होळी प्रज्वलित करण्यासाठी वाळलेल्या फांद्या, झावळ्या, टाकून दिलेल्या लाकडी फळ्या आदी अनावश्यक गोष्टी वापरल्या जायच्या. पण, बदलत्या काळात हे नियम मागे पडले, कारण आपली होळी जास्तीत जास्त मोठी आणि जास्त वेळ कशी राहील, याचीच स्पर्धा निर्माण होऊ लागली. धुळवडीच्या निमित्ताने हलक्याफुलक्या वातावरणात रंग खेळले जायचे. जाणार्‍या-येणार्‍याला उपद्रव होणार नाही, कुणाला इजा होणार नाही, याची काळजी घेतली जायची. आपण तीच परंपरा जपण्याचा संकल्प आज करू या!