...म्हणून पुसली जात नाही मतदानाची शाई

    20-Mar-2019
Total Views |
निवडणूक म्हणजे एकप्रकारचा उत्सव असतो. प्रत्येक पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे असतात. या उत्सवात उतरणारा प्रत्येक राजकीय पक्ष मतदात्यांना खुश करण्यासाठी विविध घोषणांचा पाऊस पाडतो. मग आपणही कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे यावर चर्चा करु लागतो. पाहता पाहता मतदानाचा दिवस उजाडतो आणि मतदाता मतदान केंद्रावर पोहोचतो. तेथे मतदान करण्यापूर्वी आपल्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या निळ्या शाईचा इतिहास.
 
 
१९५१- ५२ साली आपल्या देशात पहिली निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी बोटाला निळ्या रंगाची शाई लावण्याचा नियम नव्हता. त्यामुळे अनेक मतदारांनी आपल्या आवडत्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी दोन वेळा मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले. नियमाप्रमाणे एका उमेदवाराला एका मतदात्याने एकदाच मतदान करणे गरजेचे आहे. तरच या संपूर्ण निवडणूक प्रकल्पाला निष्पक्ष प्रक्रिया म्हणता येईल. परंतु पहिल्याच निवडणुकीत झालेल्या गोंधळामुळे अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने एका रासायनिक पदार्थाचा शोध लावला होता. हा पदार्थ पाण्याने किंवा कुठल्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थाच्या मदतीने मिटवता येत नव्हता. निवडणूक आयोगाने या पदार्थाची संपूर्ण माहिती घेऊन याचा वापर निवडणूक प्रक्रियेसाठी करण्याचा निर्णय घेतला. या पदार्थाला ‘अमिट शाई’ असे नाव देण्यात आले. मतदान करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तिच्या बोटावर ही निळी शाई लावली जाते. ही शाई एकदा आपल्या बोटाला चिकटली की पुढील काही दिवस त्याला मिटवता येत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती जर दुसऱ्यांदा मतदान करण्यास आला तर त्याला पकडता येते. या शाईमुळे आपली निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ झाली.
अनेक संशोधकांनी या शाईत वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ या कंपनीने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होण्यासाठी ही शाई बनवण्याची प्रक्रिया गुप्त ठेवली आहे. आज जगातील तुर्कस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना असे तब्बल २८ देश या अमिट शाईचा आपल्या निवडणुकीत वापर करतात.