चौकीदार शब्दही कॉंग्रेसला महागात पडणार!
   दिनांक :21-Mar-2019
 दिल्ली वार्तापत्र 
शामकांत जहागीरदार 
चौकीदाराच्या मुद्यावरून भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल मुद्यावरून ‘चौकीदार चोर आहे,’ असे आरोप केले. या आरोपाच्या प्रत्युत्तरात भाजपाने ‘मीपण चौकीदार’ अभियान सुरू केले आहे.
 
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत ‘चौकीदार चोर आहे,’ अशा आरोपांची मालिका सुरू केली. राहुल गांधी लोकसभेत अधिकृतपणे विरोधी पक्षनेते नसले, तरी विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र कोणताही आरोप करताना आपण देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करतो, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे. आरोप करताना सभ्यता, शालीनता आणि संयम बाळगणे आवश्यक आहे. यासोबतच भाषेची मर्यादाही महत्त्वाची आहे.
 
देशाच्या पंतप्रधानांचा चोर म्हणून उल्लेख करणे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना शोभत असले, तरी ते संसदीय लोकशाहीला शोभणारे नाही. ‘बडे मियॉं तो बडे मियॉं छोटे मियॉं सुभानअल्ला’ याप्रमाणे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा उल्लेख ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’च्या धर्तीवर ‘मोदीबाबा आणि चाळीस चोर’ अशा भाषेत करत आपली संस्कृती दाखवून दिली.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत, माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘चायवाला’ असा केला होता. चायवाला म्हणत त्या वेळी मोदी यांना हिणवायचा अय्यर यांचा प्रयत्न होता. पण, मोदी यांनी कॉंग्रेसचा हा प्रयत्न त्यांच्यावर पद्धतशीर उलटवून लावला. हो मी चायवाला आहे, माझे वडील रेल्वेस्थानकावर चहा विकत होते आणि त्याचा मला अभिमान आहे, असे मोदी यांनी सांगत या मुद्यावरून रान उठवले. भाजपाने देशभर ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले.
 
चायवाला म्हणून मोदी यांना हिणवणे कॉंग्रेसला चांगलेच महागात पडले, भाजपा बहुमताने सत्तेवर आली आणि कॉंग्रेस नेते चहालाही महाग झाले. 2014 मध्ये जी चूक कॉंग्रेसने केली, तीच ते आता 2019 मध्ये पुन्हा करत आहेत. या काळात कॉंग्रेसची बौद्धिक झेप चायवाला ते चौकीदारपर्यंतच गेली. भाजपाने यावेळीही चौकीदार हा मुद्दा कॉंग्रेसकडून हिसकला आहे. ‘मीपण चौकीदार’ या भाजपाने सुरू केलेल्या अभियानाला देशातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील आणि बुद्धिजीवी लोक मोठ्या संख्येत या अभियानात सहभागी झाले आहेत. ही संख्या काही कोटीच्या घरात गेली आहे.
आपल्यावर फेकलेल्या प्रत्येक दगडाची पायरी करण्याचे आणि त्या पायरीवरून सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्याचे नरेंद्र मोदी यांचे कौशल्य वादातीत आहे. 2014 मध्ये मोदी यांना चायवाला या उपाधीने पंतप्रधानपदावर बसवले आणि यावेळी चौकीदार ही उपाधी त्यांना पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान करेल, यात शंका नाही.
 
 
 
चौकीदाराचे काम कोणत्याही संपत्तीचे चोरापासून रक्षण करण्याचे असते. चौकीदार स्वत: जागते रहो म्हणत रात्रभर गस्त घालत असल्यामुळे आपण निर्धास्त झोपू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. चौकीदाराने गस्त घालणे सोडून दिले तर आपली झोप उडून जाईल. चौकीदार जे काम करतो, त्याची किंमत आणि कदर आपल्याला नसल्यामुळे आपण त्याची खिल्ली उडवत असतो. राहुल गांधींचे नेमके हेच झाले आहे.
 
चौकीदार हा फक्त घरगुती वा समाजातील मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नसतो, तर मोदींसारखा चौकीदार असेल तर त्याला देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता याचेही संरक्षण करावे लागते. देशाच्या सीमेच्या आत कॉंग्रेससारखे भुरटे चोर असो, की सीमेबाहेर पाकिस्तान आणि चीनसारखे आपले शत्रू असो, यांच्यापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी चौकीदार हा नरेंद्र मोदींसारखाच कणखर आणि भक्कम पाहिजे. चौकीदार कणखर नसेल तर कॉंग्रेससारखे चोर संपूर्ण देश विकून टाकायलाही मागेपुढे पाहणार नाही.
 
चोरांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा देशातील चौकीदारांचीही संख्या वाढवावी लागते. भाजपाने आपल्या ‘मीपण चौकीदार’ या अभियानातून हाच प्रयत्न केला आहे. सामान्य माणसाची नेहमीच ‘मला काय त्याचे’ ही प्रवृत्ती असते, भाजपाच्या ‘मीपण चौकीदार’ अभियानाने सामान्य माणसाच्या या मन:स्थितीत बदल घडवून आणला आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असतो, कुटुंबाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असेल, तर आपल्या देशाचे रक्षण करणे, हेही आपले आद्यकर्तव्य आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
 
मुळात कॉंग्रेस ‘चौकीदार चोर आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणत असली तरी कॉंग्रेसचे खरे दु:ख चौकीदार चोर नाही, हेच आहे. कॉंग्रेसच्या काळातील सगळे चौकीदार चोर होते, मग भाजपाच्या काळातील चौकीदार चोर का नाही, ही कॉंग्रेसची व्यथा आणि वेदना आहे. आपल्या कार्यकाळात संरक्षण साहित्य खरेदीचा एकही सौदा आपण दलाली घेतल्याशिवाय होऊ दिला नाही, मग यावेळचा संरक्षण साहित्य खरेदीचा सौदा दलाली न घेता कसा होऊ शकतो, हे कॉंग्रेसचे खरे दु:ख आहे.
माझ्या शर्टावर भ्रष्टाचाराचा एक नाही तर अनेक डाग असतील, तर तुमचा शर्ट पांढरास्वच्छ कसा राहू शकतो, तुमच्या शर्टवरही चिखलफेक करून आम्ही काही डाग पाडू शकतो, ही मोदी यांना चोर ठरवण्यामागची कॉंग्रेसची भूमिका आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आणि महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न त्यासाठीच सुरू होता. पण, तो सुद्धा विफल ठरला. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची तथाकथित महाआघाडी ही ‘चोर चोर मौसेरे भाई’ यासारखी आहे. मात्र, कॉंग्रेसच्या या प्रयत्नांना जनतेची साथ मिळत नाही. कारण चोर कोण आहे, हे या देशातील विरोधकांना आणि जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.
 
देशातील जनता कॉंग्रेसला चांगल्याप्रकारे ओळखून आहे. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला तिची जागा दाखवून देत 44 वर आणले. मात्र अजूनही कॉंग्रेसला शहाणपणा येत नाही, याचे आश्चर्य वाटते. मोदींना चोर ठरवण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी आपण काय करणार, हे राहुल गांधींनी सांगण्याची गरज आहे. भाजपाला पराभूत करायचे असेल, तर तिच्या रेषेपेक्षा आपली रेष मोठी करण्याची गरज आहे. पण, आपली रेष मोठी करता येत नसल्यामुळे राहुल गांधी भाजपाची रेष छोटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत.
 
राहुल गांधींकडून प्रगल्भ राजकीय वागणुकीची अपेक्षा करणे म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांची पाठराखण थांबवण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. सुर्जेवाला यांचा मोदींना अलिबाबा चाळीस चोर ठरवण्याचा प्रयत्न जुन्या काळातील एचएमव्हीच्या ग्रामोफोनच्या तबकडीवरील चित्रासारखा आहे. सुर्जेवाला यांचा आवाज हा त्यांचा नाही तर हिज मास्टर्स व्हॉईससारखा आहे. अलिबाबा आणि चाळीस चोर कोण आहेत, हेे देशातील जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.
 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने अलिबाबी आणि चाळीस चोरांनाच तर सत्तेवरून पायउतार केले होते. यावेळी तर अलिबाबा आणि चाळीस चोर सत्तेत नसल्यामुळे त्यांना सत्तेवरून पायउतार करण्याचा प्रश्न नाही, तर सत्तेपासून पुन्हा दूर ठेवण्याचा आहे. मुळात कोणत्याही चोरांची जागा ही संसदेत नाही तर तुरुंगात असते. हे या देशातील जनतेला चांगल्याप्रकारे माहीत आहे. 2014 मध्ये जनतेने कॉंग्रेसमधील अलिबाबा आणि चाळीस चोरांना संसदेबाहेर काढले, तरीही त्यांना शहाणपण येत नसेल, तर 2019 च्या निवडणुकीनंतर त्यांची जागा खर्‍या तुरुंगात आहे, हे सांगायला जनता मागेपुढे पाहणार नाही.