यवतमाळ-वाशीम मतदारसंघात या दोन उमेदवारांची चर्चा
   दिनांक :22-Mar-2019
 
 
यवतमाळ: यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज नेणार्‍या दोन व्यक्तींच्या नावांची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होत आहे. येथील ख्यातनाम ॲड. जीवन पाटील आणि भाजपाचे कार्यकर्ते परशराम आडे यांनी आपल्या नावाने लोकसभा उमेदवारी अर्ज नेले असून ते चर्चेचा विषय झाले आहेत.
 

 
 
या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून जीवन पाटील यांचे नाव सुरवातीपासूनच चर्चेत आहे. परंतु, या ठिकाणी आता माणिकराव ठाकरे यांचे नाव कॉंग्रेसने अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे जीवन पाटील यांचे नाव आता मागे पडले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. जीवन पाटील यांनी नामांकन दाखल करण्यासाठी नेलेल्या अर्जामुळे या मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कारण कॉंग्रेसकडे उमेदवारी मागणारे आणि अधिकृतपणे अर्ज घेऊन जाणारे जीवन पाटील वेगवेगळे आहेत.
 
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परशराम आडे यांनीही काही वर्षांपासून खासदारकीची तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्या दिशेने एक पाऊल म्हणून गेल्या दोन-तीन वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जनमानसात आपली प्रतिमा स्थापित केली होती. परंतु, भाजपा-शिवसेना युती झाल्यामुळे ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारीतून कटल्यामुळे आडे यांनी नेलेला अर्ज हाही या मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे.