मोसुल बोट दुर्घटना; ९४ जणांचा मृत्यू
   दिनांक :22-Mar-2019
बगदाद :
 
इराकच्या मोसुल भागात एका नदीमध्ये होडी उलटल्याने ९४ जण ठार झाले असून यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. कुर्दिश समाजाचे हे लोक नौरौज या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. या दुर्घटनेमुळे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
 
 
जगभरात होडीमध्ये क्षमतेपेक्षाही जादा प्रवासी भरल्याने बुडाल्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दजला नदीकाठाच्या बाजुला राहणारे कुर्दिश समाजाचे लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. मात्र, त्यांची होडी नदीच्या मध्यभागी कलंडल्याने ९४ जणांचा बुडून मृत्यू झाला. तर ५५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये १९  लहान मुले आणि ६१ महिलांचा समावेश आहे.
 
इराकवर गेल्या दशकभरापासून आयएसआयएससारख्या दहशतवादी संघटनांचा ताबा होता. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर लोकांना मारले जात होते. मात्र, होडी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना कमीच होत्या. या घटनेमुळे देशाला मोठा हादरा बसला आहे.पंतप्रधान अदेल यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेची कल्पना कोणी करू शकत नाही. एक व्यक्ती पोहत किनाऱ्यावर आला. होडीमध्ये महिलांसह मुलांची संख्या मोठी होती. यामुळे मृतांचा आकडा वाढला. मोसुलच्या सुरक्षा अधिकार्यांनी सांगितल्यानुार होडीमध्ये १०० हून अधिक लोक प्रवास करत होते. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती घेतल्याने ही दुर्घटना घडली.