रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका
   दिनांक :22-Mar-2019
गोंदिया : बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वेगाडी बालाघाटवरून सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे.
 
पूर्वी गोंदिया-इतवारी रेल्वेगाडी गोंदियावरून दुपारी 3.10 मिनिटांनी सुटायची, तर सायंकाळी 6 वाजता इतवारी स्टेशनवर पोहोचायची. त्यानंतर ही गाडी पुन्हा डोंगरगडला जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सुविधा होत होती. मात्र रेल्वेने महिनाभरापूर्वीच या गाडीचा विस्तार बालाघाटपर्यंत केला. तेव्हापासून ही गाडी गोंदिया, डोंगरगड, बालाघाट येथे वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाडीला बालाघाटपर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळचे 6 वाजतात. जेव्हा की या गाडीची वेळ दुपारी 4.15 वाजताची आहे. ही गाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर वेळेत पोहोचली तरी या गाडीला आऊटरवर बराच वेळ थांबविले जाते. या गाडीसाठी या वेळेत फलाट उपलब्ध राहत नसल्याचे कारण सांगितले जाते. परिणामी बालघाटवरून येणार्‍या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 

 
 
गोंदिया रेल्वेस्थानकावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांची संख्या न पाहताच रेल्वेने या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गाडी जेव्हा गोंदियावरून सुरू होती, तेव्हा प्रवाशांना सहज जागा मिळायची. मात्र या गाडीचा बालाघाटपर्यंत विस्तार केल्यापासून प्रवाशांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावर आधीच रेल्वेगाड्यांची संख्या भरपूर होती. गोंदिया ते समनापूर सायंकाळी 5 वाजता, गोंदिया ते वाराशिवनी-कटंगी 2.40 वाजता आणि बालाघाट-इतवारी पॅसेंजर या रेल्वेगाड्या धावतात. रेल्वेने या गाडीचा विस्तार केला असला तरी या मार्गावरील प्रवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोय होत आहे.