मधमाश्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
   दिनांक :22-Mar-2019

मधमाश्यांपासून सुटका करतांना ह्रदयविकाचा आला झटका
दिग्रस:  येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे तथा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुधाकर गडकर यांच्यावर शेतातील मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांपासून सुटका करतांना धाप लागल्याने ह्रदयविकाचा तिव्र झटक्यात त्यांचे क्षणात निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 

 
 
 
सुधाकर गडकर यांनी गुरुवार, २१ मार्चला रंगपंचमी निमीत्ताने जवळच्या शेतात आपल्या मित्रांना घेऊन हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. सकाळी आपल्या परिवारा बरोबर उत्साहाने रंगपंचमीचा आनंद घेतला आणि दुपारी घरुन निघाले, मात्र पुढील काही तासात घरी त्यांचे पार्थिव शरीरच परत आल्याने गडकर परिवारासह शहरात एकच खळबळ उडाली.
शेतात हुरडा पार्टी सुरु असतांना, पेटलेल्या चुलीची आस झाडावरील मधमाश्याच्या छताला लागली आणि एका क्षणात शेकडो मधमाश्याने तिथे उपस्थित लोकांवर हल्ला चढविला, मधमाश्या पासून आपली सुटका करण्यासाठी सर्व रस्ता मिळेल त्या वाटेने पळू लागले. सुधाकर गडकर यांना पळता पळता धाप लागली व यातच त्यांना ह्रदय विकाराचा तिव्र झटका आला आणि पाहता पाहता सुधाकर गडकर यांची प्राण ज्योत मावळली.
गडकर हे मुळचे दिग्रस येथील विठ्ठल नगर येथे राहतात येथील ग्रामसेवक म्हणून व आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली, येथील हिंदु मोक्षधामभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेसात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.