'दहशतवाद्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने घेतले ताब्यात'
   दिनांक :22-Mar-2019
पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आणि पाकिस्तानी संसदेचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर टिका केली आहे. भारतीय विमानांनी दहशवाद्यांवर बॉम्ब हल्ला करुन त्यांच्या खात्मा करु नये म्हणून सरकारने त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले असल्याचे मत बिलावल यांनी नोंदवले आहे.
 
 
दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारचा उद्देश संशयास्पद असल्याचे बिलावल म्हणाले आहेत. ‘इम्रान खान यांच्या सरकारने दहशतवाद्यांना अटक केलेली नाही. उलट भारतीय विमानांनी बॉम्ब हल्ला करुन त्यांचा खात्मा करु नये म्हणून संरक्षणार्थ त्यांना सरकारने ताब्यात घेतले आहे,’ अशा शब्दांमध्ये बिलावल यांनी इम्रान सरकारला लक्ष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बिलावल यांनी हे मत नोंदवले. 
दहशतवादी संघटनांना वाचवण्याबरोबरच इम्रान खान याच दहशतवादी संघटनांचा वापर करुन घेत असल्याचा आरोपही बिलावल यांनी केला आहे.