चीनमध्ये स्फोटातील मृतांची संख्या ६४
   दिनांक :23-Mar-2019
बीजिंग :
 चीनमध्ये जियांगत्सू प्रांतातील यानचेंग येथे रासायनिक प्रकल्पाच्या खत कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांची संख्या आता ६४ झाली आहे. यात शोध व मदतकार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केले आहे. चायना डेलीने दिलेल्या माहितीनुसार एकूण ६४ जण यात ठार झाले असून ९० जण गंभीर जखमी झाले आहेत.

 
अध्यक्ष क्षी जिनपिंग हे सध्या पाच दिवस युरोपच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी सांगितले की, जे ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत व जखमी आहेत त्यांना मदत करण्यात यावी. जखमींवर वेळीच उपचार करावेत. पर्यावरण निरीक्षण, सतर्कतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करून पर्यावरणाची हानी टाळावी.
 

 
या स्फोटाची झळ शेजारच्या १६ कारखान्यांना बसली असून आगीमुळे मोठय़ा प्रमाणात हवा प्रदूषण झाले आहे. शी जिनपिंग यांनी आदेश दिले की, आगीचे कारण लवकरात लवकर शोधून काढावे. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले की, स्फोटाच्या ठिकाणाहून ८८ जणांची सुटका करण्यात आली आहे. इमारतींमध्ये अनेक कामगार अडकून पडले असून कीटकनाशकांच्या कारखान्यात हा स्फोट होऊन आजूबाजूच्या निवासी इमारतीही हादरल्या आहेत.
 

 
जियांत्सू येथील अग्निशमन यंत्रणेने एकूण १७६ बंब व ९२८ कर्मचारी घटनास्थळी पाठवले असून या स्फोटातून बाहेर पडलेल्या रसायनांमुळे लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. किमान ५०० मीटर त्रिज्येच्या क्षेत्रात हवेत विषारी पदार्थ आढळलेले नाहीत पण जोरदार वाऱ्यामुळे धूर वरच्या भागात जाण्याची शक्यता पर्यावरण संरक्षण संस्थेने वर्तवली आहे. या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून जखमींमध्ये शाळकरी मुलांचा समावेश आहे. या परिसरात १० शाळा आहेत.