गुन्हेगारी वृत्तीच्या उमेदवारांना माहिती देणे बंधनकारक
   दिनांक :23-Mar-2019
 
वृत्तपत्र, टीव्हीवरून माहिती प्रसिद्ध करा
 
निवडणूक आयोगाचे कौतुकास्पद पाऊल
 
भंडारा: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांनी, त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी व फौजदारी प्रकरणांची माहिती निवडणूक लढवीत असलेल्या भागात सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात व प्रसिद्ध टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार आयोगाने हे निर्देश दिले असून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांनी या निर्णयाचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे मतदारांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडण्यास मदत होणार आहे. निवडणूक आयोगाचे निर्देश कौतुकास्पद असून मतदारांकडून या निर्देशाचे स्वागत करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार उमेदवारावर गुन्हेगारी व फौजदारी प्रकरण असल्यास वृत्तपत्र वा दूरदर्शनवरून अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर आणि मतदानाच्या दोन दिवसअगोदर किमान 3 वेळा वृत्तपत्र व टीव्ही चॅनेलवरून जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
 

 
 
जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यात जाहिरात प्रसिद्धीची माहिती भरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाऊ शकते. टीव्ही चॅनेलवर देण्यात येणारी जाहिरात सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात उमेदवार निवडणूक लढत आहे, त्या भागातील प्रचलित भाषेत किंवा इंग्रजी भाषेत जाहिरात असणे आवश्यक असून त्यामध्ये एफआयआरचा नंबर, त्याची सद्यस्थिती याबाबत माहिती असणे बंधनकारक आहे. ज्या उमेदवारावर गुन्हेगारी, फौजदारी प्रकरण नाही, त्यांनी अशा प्रकारची जाहिरात देण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या उमेदवारावर गुन्हेगारी, फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे, त्यांना जाहिरात देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे मतदारांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडून देण्यास सोईचे होणार आहे.