वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण
   दिनांक :23-Mar-2019
 पातूर: थकीत असलेल्या वीजदेयक वसुलीसाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास विजग्राहकाने मारहाण केल्याची घटना आज  गावंडगाव येथे घडली. सस्ती येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता डी. के. कंकाळ आपल्या पथकासह थकित विद्युत बिल वसुली करण्यासाठी शनिवारी गावंडगाव येथे गेले होते. गावातील उमेश शेषराव चव्हाण यांच्याकडे थकबाकी वसुलीसाठी पथक गेले असता, त्याने वीज बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे पथकाने वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईला सुरुवात करताच उमेश चव्हाण याने लाईनमन मंगेश वासुदेव गवई याला काठीने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी चान्नी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. लाईनमन मंगेश वासुदेव गवई यांच्या फिर्यादीवरून गावंडगाव येथील उमेश शेषराव चव्हाण याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.