एका तिकिटाची कथा...
   दिनांक :24-Mar-2019
फेटे-फटकारे
- कौतिकराव 
 
तर एका निवडणूक देवा तिकिटाची कथा. ही कथा खरी आहे. सत्य आहे. एकदम रीयल आहे. एकदम यांगचुक आहे. आता तुम्ही म्हणाल यांगचुक म्हणजे काय? तर चीनी भाषेत सत्य म्हणजे यांगचुक. (तुमचा विश्वास बसत नसेल तर चीनी शब्दकोष जो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रकाशित केला आहे त्यात बघा!)
 
तर विषय सत्य म्हणजे काय, हा नाहीच मुळात. विषय हा आहे की ही कथा सत्य आहे. तिच्या सत्यतेवर शंका घेणार्‍याचे वाटोळे होते. अगदी केजरीवाल यांचे झाले तसेच वाटोळे होते. अलिकडे वाटोळे होणे म्हणजे केजरीवाल होणे, असा समानार्थी वाक्‌प्रचार आला आहे... तर विषय तोदेखील नाही. तर या तिकिट वाटपाच्या कथेवर ज्याने अविश्वास दाखविला त्याचे वाटोळे होते. हे एक व्रत आहे आणि ते या दिवसात करावेच लागते. ज्यांना निवडणुकीत उभे रहायचे आहे, (नंतर आडवे होण्यासाठीही का होईना!) त्यांनी हे व्रत करायचे असते. मग तिकिट वाटपाची ही कहाणी ऐकायची आणि मग उपवास सोडायचा. त्यासाठी कोंबडीच्या तंगड्यांचा नैवद्य आणि तुमच्या आवडत्या ब्रँडचे तीर्थ असले पाहिजे. चखणा नावाचा प्रकार या उपवासाच्या सांगतेला चालत नाही. तीर्थ मात्र हवेच असते, कारण व्रत सार्थकी लागले आणि तिकिट मिळाले तर ‘आनंद’ म्हणून आणि नाही मिळाले तर ‘दर्द मिटाने के लीए’ हे तीर्थ घेण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे महाराजा आपल्या देशांत!
 
 
 
तर ही कहाणी आहे. आटपाट नगरात एक कार्यकर्ता रहायचा. आता सुरुवातीला त्याने सतरंज्या उचलल्या. सर्वपक्षीय चापलुसी करून पाहिली अन्‌ मग त्याने सुरुवातीला त्याच्या ग्राम पंचायतची नगर सेवकाची निवडणूक बंडखोरी करून लढविली. त्यात जातीचे गणित अन्‌ धर्माची भूमिती यांचा पायथागोरसचा सिद्धांत नीट लागू पडला अन्‌ तो निवडून आला. मग त्याच सिद्धांतानुसार त्याच्याच राजकीय आकारमानाइतके पाणी (धन) उसळेल याची काळजी घेतली. आपल्या मूळ पक्षांत तो दाखल झाला. सरपंच झाला. मग जिल्हा परिषद लढला. त्याला मग आमदारकीचे ख्वाब (स्वप्न हा मराठी शब्द माहिती आहे; पण इथे ख्वाब हा शब्द कसा जोरकस वाटतो.) पडू लागले. ते विद्यमान आमदाराला कसे सहन होणार? याने तिकिट मागितले. आमदाराने मुंबई दरबारी आपले वजन वापरून याचे तिकिट कापले. याने मग पुन्हा बंडखोरी केली. यावेळी जात अन्‌ धर्माचे भूमिती अन्‌ बीजगणित होतेच; पण सोबत ‘ ॲक्शन अँड रीॲक्शन इज इक्वल अँड अपोझीट’ हा भौतिकशास्त्रातला नियमही त्याने लावला. राजकारणातला पैसा राजकारणातच लावायचा म्हणजे जितका पैसा लावाल तितकी मते मिळतात, हा तो सिद्धांत होता. तो आमदार झाला.
 
निवडणूक देवतेचे व्रत तो नियमाने करायचा. आपल्या मतदारसंघात कामे आपल्याच नातेवाईकांना िंकवा कार्यकर्त्यांना द्यायचा. त्यात कमिशन घ्यायचा. त्याचा वाटा अगदी दिल्ली- मुंबईपर्यंत पोहोचवायचा. म्हणजे या कमाईत महत्तम साधारण विभाज्यचे नियम तो लावायचा. बेट्याचे गणित पक्के होते. लसावी, मसावी त्याला काढता येत होता. म्हणून आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आमदार असूनही तो मंत्री झाला.
 
मग त्याला दिल्ली खुणावू लागली होती. त्याला तसा शब्दही मिळाला होता. मात्र, या व्रताचे सांगणेच हे की, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका... तो व्रत करायचे विसरला. गणित अन्‌ भूमितीही पक्की असून ‘काटकोन त्रिकोणाचे इतर दोन कोन हे पंचेचाळीस अंशाचे असतात आणि दोघांची बेरीज ९० अंशच होते.’ हे साधे सुत्र तो विसरला. त्यामुळे त्याच्याच झेडपी सर्कलमधले त्याचे दोन कार्यकर्ते एकत्र झाले अन्‌ मागच्या निवडणुकीत पडलेल्या त्यांच्याच पक्षाच्या माजी खासदाराला जावून मिळाले. याने पूर्ण फिल्डींग लावूनही याचे तिकिट कटले. मग सवयीनुसार बारमध्ये गेला. थोडे तीर्थ पोटात गेल्यावर त्याला स्मरण झाले ते व्रताचे...
 
तो घरी आला. मग त्याने पुन्हा व्रत सुरू केले. कार्यकर्ते जोडले, काही झोडले, काही फोडले. मतदारसंघात संपर्क ठेवला. तोरणा- मरणाला हजर असायचा. मतदारांच्या (माणसे नाही) लग्नात हसायचा, मरणात रडायचा. एखादा प्रकल्प आणला खासदाराने तर त्या विरुद्ध आंदोलन करायचा. पर्यावरण रक्षणासाठी अन्‌ जनतेच्या भल्यासाठी राजकीय फायद्याला लाथ मारतो, जनता आधी अन्‌ मग पक्ष, अशी वचने तो उद्धृत करू लागला. त्यातून दोन गोष्टी झाल्या. जनता सोबत आली अन्‌ मांडवलीचा पैसाही आला. उपयोगी मूल्यापेक्षाही उपद्रवाला नमस्कार करतात लोक, हे या व्रताच्या पोथीतच सांगितले आहे निवडणूक देवतेने.
पाच वर्षे हा हा म्हणता गेली. त्याने पक्षाकडे तिकिट मागितले. यावेळी देवता प्रसन्न झाली. गेल्या वेळी कटलेले तिकिट यावेळी त्याला चिकटले. तो खासदार झाला. आता त्याला केंद्रात मंत्रीही व्हायचे आहे... निवडणूक देवता त्याला जशी पावली तशी प्रत्येक इच्छूकाला पावो... पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण!
 
(टीप : ही कथा बहुसंख्य नेत्यांना तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अरेच्चा! ही तर माझीच कथा, असे कुणी म्हणू नये.)